मुंबई : शिवसेनेतल्या (Shiv Sena) बंडाळीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) पहिल्यांदाच मनमोकळे बोलले आहेत. शिवसेनेतल्या बंडाची आपल्याला आधीच कल्पना होती, असं अजित पवारांनी ‘लोकमत’ वृत्तसमूहाच्या एका कार्यक्रमात सांगून टाकलंय. शिवसेनेतल्या बंडाची कल्पना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना आधीच आली होती, असा दावा अजित पवारांनी केलाय.
जून महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सोबत काही आमदार पहिल्यांदा सूरतला आणि तिथून गुवाहाटीला गेले. पण त्यावेळी शिवसेनेचे काही ज्येष्ठ आमदार मुंबईतच होते.
या आमदारांनी ‘वर्षा’ बंगल्यावर जात उद्धव ठाकरेंशी चर्चाही केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंना भेटायला गेलेल्या आमदारांमध्ये दादा भुसे, गुलाबराव पाटील आणि दीपक केसरकर यांच्यासारख्या ज्येष्ठ आमदारांचा समावेश होता. पण या आमदारांनाही थांबवण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न झाला नसल्याची शंका अजित पवारांनी व्यक्त केलीय.
शिवसेनेतल्या बंडाशी भाजपचाच संबंध होता. पण भाजप नेत्यांनी सुरुवातीला हे नाकारलं असंही अजित पवार म्हणालेत.
सत्ता स्थापनेच्या आधी शिंदे आणि फडणवीसांमध्ये होत असलेल्या भेटीगाठींवरुन अजित पवारांनी “काही जण वेशांतर करुन भेटत होते”, असा टोला मारलाय..
एकनाथ शिंदेंच्या बंडाची इत्यंभूत माहिती असूनही, सरकार कोसळेल ही शक्यता माहित असतानाही, उद्धव ठाकरे गाफील राहिले का? आमदारांना सांभाळण्यात त्यांना अपयश आलं का? अजित पवारांच्या मुलाखतीनंतर हेच प्रश्न निर्माण झाले आहेत.
दरम्यान, शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यातील सत्तांतराला आता सात महिने पूर्ण झाले आहेत. पण या सात महिन्यांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार अद्याप पार पडलेला नाही.
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावरुन शिंदे गटातील आमदारांमध्ये मतभेद असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. याशिवाय शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही सत्ताधारी पक्षांमधील धुसफूस काही प्रमाणात समोर आलीय. त्यामुळे आगामी काळात आणखी काय-काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.