महायुतीत मुख्यमंत्री बनण्याच्या शर्यतीतून अजित पवार आऊट झाले आहेत. जागा कमी घेतल्यामुळे मी मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडण्याच्या तडजोडीस तयार आहे. टीव्ही ९ मराठीच्या मुलाखतीत अजित पवारांचं मोठं विधान समोर आले आहे. ज्या मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न उराशी घेत अजित पवार भाजपसोबत सत्तेत सामील झाले. त्याच मुख्यमंत्रीपदावरच्या दाव्यावर येत्या निवडणुकीत अजित पवार पाणी सोडण्यास तयार आहेत. जागा कमी लढत असल्यामुळे आम्ही थांबण्यास आणि तडजोडीस तयार असून., तूर्तास महायुतीचं सरकार प्राधान्य असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे.
महायुतीत फडणवीस समर्थक जाहीरपणे फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून दावा करतात. शिंदेंचे नेतेही त्याचप्रमाणे बोलतात. मात्र अजित पवारांच्या गटातून यावेळी मुख्यमंत्रीपदाचा कोणताही दावा केला जात नाहीय. काल-परवा समर्थकांनी अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची पाटी भेट दिली., तेव्हा अजित पवारांनी त्यातल्या मुख्यमंत्री शब्दावर हात ठेवून झाकण्याचा प्रयत्न केल्यानं बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या.
तूर्तास भाजपसोबत सत्तेत जाताना ज्या मुख्यमंत्रीपदाचं लक्ष्य अजित पवारांनी जाहीर सभेत सांगितलं होतं. त्याच पदाचं सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नाव घेण्यासही धजावत नाहीयेत. कारण अजित पवार आपलीच खरी राष्ट्रवादी असल्याचा दावा करत असले तरी महायुतीत त्यांना मिळालेल्या जागा या दाव्याला पूरक नाहीत.
103 आमदार असणारी भाजप 152 जागा लढवत आहे. 40 आमदार असणारे शिंदेंच्या शिवसेनेचे 85 उमेदवार आहेत. आणि 38 आमदार असणाऱ्या दादांच्या राष्ट्रवादीला अवघ्या 55 जागांवर समाधान मानावं लागलं. त्यात या 55 मध्येच काही मैत्रीपूर्ण लढती आहेत., तर ४ ते ५ जागांवर भाजपचेच उमेदवार दादांनी घड्याळाच्या चिन्हावर उभे केलेत.
दुसरीकडे या घडीला 37 आमदार असणारी काँग्रेस 101 जागांवर. 15 आमदार असणारी ठाकरेंची शिवसेना 96 जागांवर. तर 14 आमदार असणारी शरद पवारांची राष्ट्रवादी 87 जागांवर लढते आहे.
लोकसभेला अजित पवारांना फक्त 4 जागा मिळाल्या. त्यातही 2 उमेदवारांपैकी एक भाजप आणि एक शिंदेकडून आयात करावा लागला.
आणि प्रत्यक्षात एकच जागा जिंकता आली. दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 जागांपैकी 8 खासदार जिंकून आले. त्यामुळे महायुतीत गेल्यानंतर अजित पवारांनी स्वतःसह आपल्या राष्ट्रवादीची जागावाटपातली ताकदही गमावल्याचं बोललं जातंय. दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी मात्र अद्यापही महाविकासआघाडीत बार्गेनिंग पॉवर टिकवून आहे.
महायुतीत जाताना… मुख्यमंत्रीपद, राष्ट्रवादीला पुन्हा राष्ट्रीय दर्जा मिळवून देणं. 90 जागा लढवणं असे 3 लक्ष्य अजित पवारांनी ठरवले होते.
त्यापैकी मुख्यमंत्रीपदावर स्वतः दादांनीच पाणी सोडलंय. पक्षाला पुन्हा राष्ट्रीय दर्जा मिळण्याचं स्वप्न अजून दूर गेलंय आणि 90 ऐवजी हातात फक्त 55 जागा आल्या आहेत.
2019 च्या निवडणुकीत अखंड राष्ट्रवादीचे 54 आमदार असून मविआच्या ३ पक्षांच्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री होते. यंदा अजित पवारांची राष्ट्रवादी 55 जागांवर लढत असल्यानं त्यांचा स्ट्राईक रेट किती राहिल., याकडे सर्वांचं लक्ष आहे
मोठा विरोधाभास म्हणजे अजित पवार भाजपसोबत सत्तेत आल्यानंतर भाजप समर्थक काही प्रमाणात नाराज होते. त्यावेळी समुद्रमंथनात शंकरानं पचवलेल्या विषाची गोष्ट सांगून फडणवीसांनी भाजप समर्थकांची समजूत काढली होती. महाभारतातल्या कृष्णनीतीचंही उदाहरण त्यांनी दिलं होतं. तर इकडे अजित पवार महायुतीत मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडण्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा दाखला देतायत.
मविआच्या काळात अजित पवारांचा चेहरा पुढचे मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केला जात होता. मात्र विकासाचं कारण देत अजित पवार भाजपसोबत सत्तेत गेले., तूर्तास आकड्यांच्या गेममध्ये ते मागे पडल्यानं त्यांनी मुख्यमंत्रीपदाऐवजी महायुतीचं सरकार हे लक्ष्य ठेवलं आहे.