राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे सुरु झाले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरु आहे. जिल्हाध्यक्षांकडून बैठका घेतल्या जात आहेत. उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. युती अन् आघाड्यांमध्ये जागा वाटपावर प्राथमिक चर्चा सुरु झाली. त्याचवेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजी समोर आली आहे. विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांची नागपुरात बैठक घेतली. जिल्हाध्यक्षांना निधी कमी मिळतो, विकास कामे करता येत नाही, त्याबद्दल जिल्हाध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. एकीकडे नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेश समन्वयक आणि प्रदेश सरचिटणीस ईश्वर बाळबुधे यांनी अजित पवार गटाला रामराम ठोकला. दुसरीकडे आता जिल्हाध्यक्ष नाराज असल्याने चर्चेला उधान आले आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान विदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गटाला काही मिळाले नाही. आता येणाऱ्या विधानसभेत तरी जागा मिळाव्यात, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. महायुतीत राष्ट्रवादीचे मंत्री असताना सुद्धा निधीची कमतरता आहे. त्याबद्दल जिल्हाध्यक्षांनी नाराज व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्हाध्यक्ष नाराज असल्यामुळे राष्ट्रवादीत सर्व काही आलबेल नाही, हे समोर आले आहे.
जिल्हाध्यक्षांना शासकीय समित्यांमध्ये स्थान दिले गेले नाही. जिल्हाध्यक्षांकडून दिल्या जाणाऱ्या पत्रांना मंत्र्यांकडून केराची टोपली दाखवली जाते. विदर्भाकडे नेत्यांचे दुर्लक्ष असल्याने नाराजीचा सूर सर्वांनी व्यक्त केला. यासंदर्भात पक्षातील ज्येष्ठांकडे आपले गऱ्हाणे मांडणार आहे. तसेच नाराजी संदर्भात विदर्भातील काही जिल्हाध्यक्ष एकत्र विचार मंथन करणार आहे.
अजित पवार यांची राज्यभरात जनसन्मान यात्रा सुरु आहे. पक्ष अधिक बळकट करण्याचा त्यांचा प्रयत्न या यात्रेच्या माध्यमातून आहे. त्याचवेळी विदर्भातील नाराजी समोर आली आहे. त्यामुळे ही नाराजी दूर करण्याचे आव्हान अजित पवार यांच्यासमोर आहे. आता या नाराजीची दखल वरिष्ठ नेते कशी घेतात? जिल्हाध्यक्षांची नाराजी कशी दूर करतात? याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.