महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला 3 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत आहे. आतापर्यंत लाखो महिलांच्या बँक खात्यात 3 हजार रुपये पोहोचले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत केली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जाणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना या योजनेची घोषणा केली होती. या योजनेची आता प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे. विशेष म्हणजे अजित पवार राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जावून तिथल्या जनतेशी संवाद साधत आहेत. अजित पवार यांनी नुकतंच जळगावच्या अमळनेरच्या दौऱ्यादरम्यान महिलांशी संवाद साधला होता. अजित पवार यांच्याकडून राज्यातील लाडक्या बहिणींशी संवाद साधला जातोय. या दरम्यान अजित पवारांना आज बहीण सुप्रिया सुळे यांच्यासोबत रक्षाबंधन साजरा करणार का? असा प्रश्न आज विचारण्यात आला. त्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली.
येत्या 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनाला बहीण भावाला राखी बांधते. संपूर्ण महाराष्ट्रात हा सण साजरा केला जातो. पवार कुटुंबात प्रत्येत सण एकत्र येत साजरा केला जातो. प्रत्येक रक्षाबंधनाला खासदार सुप्रिया सुळे या बंधू अजित पवार यांना राखी बांधतात. पण यावेळी राज्यातील परिस्थिती वेगळी आहे. सुप्रिया सुळे यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीत उमेदवार होत्या. त्यामुळे या दोन्ही बहीण-भावांमध्ये राजकीय वितुष्ट आले आहे. असं असलं तरीही हे बहीण-भाऊ एकत्र रक्षाबंधन साजरी करणार का? अशी अनेकांना उत्सुकता आहे. याबाबत अजित पवार यांनाच प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली.
“मी सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान रक्षाबंधनाच्या दिवशी ज्या बहिणी मला भेटतील त्यांच्यासोबत मी रक्षाबंधन साजरी करेन. सुप्रिया सुळे या देखील तिथे असतील तर मी त्यांना जावून भेटेन”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. त्यामुळे आता येत्या रक्षाबंधनाच्या दिवशी सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्र रक्षाबंधन साजरी करतात का, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. याआधी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी एकत्र येत दिवाळी साजरी केली होती. पवार कुटुंबिय एकत्र सर्व सण साजरी करत असतात. पण यावेळी निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे अजित पवार हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत.