पुणेः महाविकास आघाडी सरकारमधील निधी वाटपाच्या कुरबुरी आजपर्यंत लपून राहिलेल्या नाहीत. विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत (Ajit Pawar) याविषयी काँग्रेसचे (Congress) काय मत आहे, हे एव्हाना उभ्या महाराष्ट्राला ठावूक आहे. मात्र, आज प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण केल्यानंतर अजित पवारांनी या नेहमीच्या टीकेला थेट आणि सविस्तर उत्तर देत अनेकांची तोंडे बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यानंतर पुन्हा एकदा या विषयावरून काथ्याकूट सुरूच होणार आहे. नेमके काय म्हणाले अजित पवार जाणून घेऊयात…
दादांचे उत्तर असे…
निधी वाटपाबाबत अजित पवार म्हणाले की, संपूर्ण राज्य डोळ्यांसमोर ठेवून निधी द्यावा लागतो. त्यामुळे मला तसे वाटत नाही. पथदिवे आणि ग्रामपंचायतीकडून येणारे पैसै मिळावेत, अशी त्यांची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांनी यामधे मुख्य सचिव, काही मंत्री यांना सूचना दिल्या आहेत, असे उत्तर त्यांनी नितीन राऊत यांच्या नाराजीबद्दल दिले. शिवाय जीएसटीच्या स्वरुपात जे पैसै केंद्र सरकार राज्यांना देत होते, ते यावर्षीपासून बंद करण्यात येणार आहेत. कारण सुरुवातीची पाच वर्षे हे पैसे द्यायचे असे ठरले होते. मात्र, कोरोनाकाळात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे हे पैसै आणखी दोन वर्षे द्यावेत, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्याच्या उपस्थितीत उद्या बैठक घेण्याचा विचार आहे. मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील. आम्ही राज्याचा भांडवली खर्च किती आहे, मागील तिमाहीत किती उत्पन्न जमा झाले याची माहिती घेतो आहोत. राज्याला उत्पन्नाचे नवीन स्तोत्र शोधावे लागणार आहेत, असे सूतोवाचही त्यांनी केले.
जीएसटी परतावा मिळाला नाही…
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याबद्दल विचारले असता अजित पवार म्हणाले की, चंद्रकांत पाटील खूप मोठे नेते आहेत. अजित पवार सारख्या लहान माणसाने त्यावर बोलणे योग्य नाही. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील 51 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. येत्या 11 तारखेला राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. मात्र, त्याआधी केंद्र सरकारकडून अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. नवीन कोणते कर आगामी अर्थसंकल्पात वाढवण्यात येणार आहेत हे आत्ताच सांगता येणार नाही. पण उत्पन्नाचे स्तोत्र वाढवणे, महसुलाची गळती रोखणे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. शिवाय केंद्र सरकारकडून राज्याला जीएसटी परताव्यापोटी मिळणारी रक्कम मिळाली नसल्याचा उच्चारही त्यांनी केला.
पक्ष वाढवण्याचा अधिकार…
मालेगावमध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसला ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर खिंडार पाडले आहे. याबाबत अजित पवार म्हणाले की, उद्या राष्ट्रवादीत काहीजण प्रवेश करणार आहेत. महाविकास आघाडीला कोणतीही अडचण न येता पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. ओबीसी आरक्षणासह आगामी निवडणुका व्हाव्यात, अशी आमची भूमिका आहे. राज्य मागासवर्गीय आयोग यावर निर्णय घेणार आहे. राज्य सरकार फक्त आयोगाला माहिती उपलब्ध करून देणार आहे. ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका पुढे गेल्या, तर आभाळ कोसळत नाही. कारण पाच वर्ष हा मोठा कालावधी. या कालावधीत ओबीसी समाजाला आरक्षणापासून वंचित राहू नये ही भूमिक असल्याचे त्यांनी सांगितले.
इतर बातम्याः
Nashik MHADA | म्हाडा भूखंडात कोट्यवधींचा घोटाळा; मंत्री आव्हाडांचा सलग 2 ट्वीटमधून बॉम्बगोळा!
Nashik | ऑनलाईन शिक्षणाने मारले, 11 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; 2 महिन्यांतली तिसरी घटना