मुंबईः अध्यक्ष महोदय, आमदार होऊन इतकी वर्ष झाली. आम्हालाही काही गोष्टी समजत नाहीत. मात्र, काही जण आमदार झाल्यावर सगळं समजतंय असं वागतात, अशा शब्दांत संतप्त झालेले उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधिमंडळात आमदारांची खरडपट्टी काढली.
आदर्श वर्तन व्हावे…
अजित पवार म्हणाले की, दोन्ही बाजूच्या आमदारांकडून आदर्श वर्तन झालं पाहिजे. लोक प्रतिनिधींच्या वर्तनामध्ये सुधारणा झाली पाहिजे. आता सभागृहातील कामकाजाचं थेट प्रक्षेपण केलं जातं. लाखो लोक मतदान करतात त्यावेळी आपण येथे येतो. आपण कुत्री, मांजरं, कोबंड्या यांचं आपण प्रतिनिधीत्व करत नाही, याचं भान राखलं पाहिजे. आपण प्राण्यांचं प्रतिनिधीत्व करत नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता कोणी पण येतेय, इथं येतेय, मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे ते तरी लक्षात ठेवलं पाहिजे. एकदाचं काय द्यायचं ते द्याना बाबा. अध्यक्ष महोदय शिस्त पाळली गेली पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी आमदारांना सुनावले.
संसदीय सदाचार वाचा…
अजित पवार म्हणाले की, सभागृहाच्या आवारात आणि आपल्या सार्वजनिक जीवनातील वर्तनाबद्दल अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. सकाळी बैठक झाली. या बैठकीला सत्ताधारी आणि विरोधक होते. सगळ्यांनीच सभागृहातील सदस्यांच्या वर्तनात सुधारणा झाली पाहिजे यावर सर्वांनी मत व्यक्त केलं. सर्वांनी पक्षीय जोडे बाजूला ठेवून चिंता व्यक्त केली. सदस्यांना वर्तनाची जाणीव करून देण्यावरही सहमती दर्शवली. आम्ही 30 वर्षांपूर्वी आलो. बाळासाहेब थोरात 35 वर्षांपूर्वी आले. तेव्हाची गोष्ट वेगळी होती. तेव्हा लाईव्ह जात नव्हतं. आता लाईव्ह जात आहे. त्यामुळे सदस्यांचं वर्तन चांगलं पाहिजे. कुणाचा अपमान होणार नाही, कुणाचा उपमर्द होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मी नेहमीच सडेतोड बोलतो. मी कोणताही पक्ष पाहत नाही. संसदीय सदाचार आणि शिष्टाचाराची आचारसंहिता हे पुस्तक सर्वांना दिलं. ते सर्वांनी वाचलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.
मुधकररावांचा दरारा…
अजित पवार म्हणाले की, सुरुवातीला मधुकरराव चौधरी अध्यक्ष असताना आम्ही आमदार होतो. तेव्हा केवढा दरारा असायचा. ते उभे असतील तर आम्ही क्रॉस करायचो नाही. आता तर आमच्या सीटवर कोणीही येऊन बसतो. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरही येऊन बसतात. त्यांना म्हटलं तेवढी तरी राहू दे. तुला 145 आमदारांचा पाठिंबा मिळाला तर बस. पण सदस्य ऐकत नाहीत. कॅबिनेटमंत्री पुढे बसायचे. आम्ही पाठी बसून त्यांच्याशी बोलायचो. त्यांना सभागृहात डिस्टर्ब करायचो नाही. आता एक पत्र दिल्यावर दहा मिनिटाने दुसरं पत्रं देतात. अरे एकदाच काय द्यायचं ते द्या ना बाबा. पण सर्वांनी शिस्त पाळा. क्रॉसिंग तर कुणाला कळत नाही. कोण कुठं उभं आहे, काय आहे हेच माहीत नाही. कसंही क्रॉसिंग केलं जातं. तिथं तर बऱ्याचदा बोलत असतात. इथं कोण तरी बोलत असतात. अध्यक्षांकडे पाठ असते. अध्यक्षांना पाठ दाखवायची नसते. आल्यावर त्यांना नमस्कार करून बसायचे असते. जातानाही नमस्कार करायचा असतो, असा डोसही अजितदादांनी पाजला.
काहींनी नमस्कार करणं सोडलं…
अजित पवार म्हणाले की, काहींनी तर नमस्कार करणं सोडून दिलंय. त्यांना तारतम्य राहिलं नाही. सगळंच आपल्याला समजतंय असं यांना वाटत आहे. आम्हाला आमदार होऊन समजत नाही. यांना कधी समजायला लागलं. याचा तरी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. कधी कधी काही प्रसंग घडतात. तेवढ्या पुरते असतात. त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्यकर्त्यांनी आणि विरोधकांनी चर्चा करून त्यातून मार्ग काढायचा असतो. आणि वेळ मारून न्यायची असते. त्याबद्दलही दुमत नाही. जोपर्यंत कुणी जर चुकीचं असेल, तर तुम्ही नियम करत नाही, तोपर्यंत चुकायचं थांबणार नाही. माझी विनंती आहे की, तुम्ही कुणी जर चुकलं तर त्याला नियम करा आणि चार तास बाहेर ठेवा. तरी त्याला त्याची चूक कळेल. चार तास कमी वाटत असेल तर एखादा दिवस बाहेर ठेवा. त्याचाही विचार करा, पण एकदम बारा बारा महिने कुणाला पाठवू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
इतर बातम्याः
मोठी बातमी, आरोग्य भरतीच्या गट क परीक्षेचाही पेपर फुटला, न्यासा कंपनीचं कनेक्शन समोर: अमिताभ गुप्ता