अजितदादांच्या गुलाबी जॅकेटची सर्वदूर चर्चा, ‘गुलाबी कॅम्पेन’ नक्की काय आहे?

| Updated on: Jul 19, 2024 | 10:35 PM

अजित पवार गटाकडून विधानसभेच्या पार्श्वभूमीवर 'गुलाबी कॅम्पेन' चालवलं जातंय का? असा प्रश्न आता निर्माण होतो आहे. तसंच अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटची देखील सर्वदूर चर्चा सुरु आहे. दरम्यान राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व कार्यक्रमांमध्ये देखील गुलाबी थीम पाहायला मिळते आहे. यामागे नेमकं काय कारण आहे.. पाहुयात

अजितदादांच्या गुलाबी जॅकेटची सर्वदूर चर्चा, गुलाबी कॅम्पेन नक्की काय आहे?
Follow us on

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून एक विशेष रणनीती आखण्यात आलीये. पक्षाला एक नवा रंग, रुप देण्याची तयारी अजित पवार गटाकडून करण्यात येतेय. यासाठी अजित पवार गटाकडून गुलाबी रंगाचा वापर प्रत्येक ठिकाणी करण्यात येत असल्याचं दिसून येतंय. अजित पवारांनी देखील आपल्या दैनंदिन जीवनात गुलाबी रंगाचा वापर वाढवल्याचं दिसून येतंय. अजित पवारांनी राज्याचा बजेट मांडला तेव्हा देखील त्यांनी गुलाबी रंगाचं जॅकेट घातलं होतं. 9 जुलैला अजित पवारांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. दरम्यान यावेळी अजित पवार गटाच्या आमदारांच्या खांद्यावर गुलाबी रंगाचंच उपरणं दिसून आलं. दरम्यान त्याच दिवशी अजित पवार गटाकडून विधानसभांच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आलं. तेव्हाही अजित पवारांनी गुलाबी रंगाचं जॅकेट परिधान केलेलं दिसलं. तर इतर आमदारांच्या खांद्यावर गुलाब रंगाच उपरणे पाहायला मिळाले.

विधानपरिषदेच्या निकालाच्या दिवशी देखील अजित पवारांनी गुलाब रंगाचं जॅकेट घातलं होतं. 14 जुलैला बारामतीत अजित पवार गटाकडून जनसन्मान रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान यावेळी सभेचा संपूर्ण परिसर आणि स्टेज हा गुलाबी करण्यात आला होता. दरम्यान याच सभेत अजित पवारांनी गुलाब जॅकेट घालून जनतेला संबोधित केलं होतं. एवढचं नव्हे तर अजित पवार गटाकडून करण्यात
येणाऱ्या जाहिरातीमध्ये देखील गुलाबी रंगाचा वापर करण्यात येतो आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नव्याने नेमलेल्या नरेश अरोरा यांच्या टीमने विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही कँपेनिंग सुरु केली आहे. नरेश अरोरांच्या कंपनीने कर्नाटकमध्ये डी.के शिवकुमार यांच्यासाठी काम केलंय. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्यासाठीही
अरोरा यांच्या कंपनीनं काम केलंय. दरम्यान आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी अरोरा यांची कंपनी काम करतेय.

गुलाबी रंग महिलांना आवडतो त्यामुळे गुलाबी कॅम्पेन महिला मतदारांना आकर्षित करणार असाही यामागचा राष्ट्रवादीचा तर्क आहे. पुढील आठवड्यात अजित पवार नगर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर लाकडी बहीण योजनेसंदर्भात ते महिलांसोबत संवाद साधणार आहेत. दरम्यान अजित पवारांच्या या दौऱ्यात देखील गुलाबी रंगाच्या कॅम्पेनची झलक दिसण्याची शक्यता आहे.

दरम्यान अजित पवारांच्या या गुलाबी जॅकेटवरुन शरद पवार गटाकडून निशाणा साधण्यात आलाय. गुलाबी रंगाच्या माध्यमातून पक्षाचं आणि स्वतचं नशिब पालटण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा टोला जयंत पाटलांनी लगावला आहे. आगामी विधानभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची राष्ट्रवादी मतदारांसमोर एका नव्या रंगात जातेय. त्यामुळे या राष्ट्रवादीच्या नव्या रंग, रुपाचा किती विधानसभेत किती फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.