उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानामुळे आता महायुतीत मोठा ट्विस्ट आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? याबाबत अजित पवार यांनी महत्त्वाचं आणि मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीचा प्रचाराचा प्रमुख चेहरा राहणार नाहीत का, तसेच एकनाथ शिंदे हे महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा राहणार नाहीत का? असा प्रश्न उपस्थित होतोय. अजित पवार यांनी नुकतंच एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत अजित पवार यांनी याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. एकनाथ शिंदे हेच आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील, महायुती एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढेल, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. पण आता अजित पवार यांनी याबाबत नवा खुलासा करत त्यांनी महायुतीमधील घडामोडींबद्दल आतली बातमी सांगितली आहे.
“आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे. आम्ही सर्व आमदार एकत्र बसून ठरवणार आहोत. फक्त महायुतीचा मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिकाधिक महायुतीच्या जागा निवडून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे”, असं अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेत आम्ही बसून निर्णय घेऊ, असं सांगितलं.
“आम्ही सर्व महायुतीचे आमदार आहेत. आम्ही सर्व एकत्र बसू आणि कुणाला मुख्यमंत्री करायचं ते ठरवणार आहोत. आता बात करायची गरज नाही. फक्त महायुतीचा मुख्यमंत्री बनवण्याचं निश्चित झालं आहे. महायुतीच्या जास्तीत जागा कशा जिंकून येतील, त्यासाठी जोराने प्रयत्न सुरु आहेत”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.