मुंबई : आज हिवाळी अधिवेनाचा शेवट झाला आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडीचाही मुद्दा चांगलाच गाजला. महाविकास आघाडी सरकारने अध्यक्ष निवडीची जोमाने तयारी, मात्र ऐनवेळी राज्यपालांकडून आलेल्या पत्रामुळे सर्व जागच्या जागी राहिले. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सविस्तर माहिती दिली आहे. घटनेची कुठेही पायमल्ली झाली नाही पाहिजे, हे आम्हा तिन्ही पक्षांचं मत आहे, त्यामुळे निवड पुढे ढकलल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे.
राज्यपालांचा आदर ठेवला पाहिजे
महामहिम राज्यपाल ही पण एक महत्त्वाची व्यक्ती आहे, त्यांचाही आदर ठेवला पाहिजे. अशी आमची सगळ्यांची भावना होती, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. आता 28 फेब्रुवारीला नागपुरात अधिवेशन घ्यायचं ठरलंय. त्या मधल्या काळात या सगळ्या अनुषंगानं शंका-कुशंका राहणार नाही, बहुमताच्या जोरावर आम्ही कोणत्याही गोष्टी रेटू शकलो असतो, पण घटनेची कुठेही पायमल्ली झाली नाही पाहिजे, हे आम्हा तिन्ही पक्षांचं मत आहे, आम्ही प्रमुख लोक राज्यपालांची पुन्हा भेट घेणार आहोत, पुन्हा पारदर्शी चर्चा होईल, अशी माहितीही अजित पवारांनी दिली आहे.
घटनात्मक अडचण राहायला नको
नियमांमध्ये बदल करण्यासाठी बैठका घेण्यात आल्या. विधानसभा अध्यक्षपद मविआ सरकारला भरायचं आहे. घटनाबाह्य आणि घटनात्मक अडचण राहायला नको, याची खबरदारी आम्ही बाळगली. राज्यपालांना मुख्यमंत्री ठाकरेंनी पत्र पाठवलं होतं. राज्यपालांची भेटही घेतली होती. घटनात्मक बाबी असल्यानं ते मी तपासतोय, असं राज्यपालांनी सांगितलं. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. आता सगळ्या गोष्टी पारदर्शकपणे होऊ लागल्या आहेत. गुप्त मतदान करण्याची पद्धत कालबाह्य झाली आहे, अध्यक्षांच्या बाबतीत उघड-उघड किंवा आवाजी मतदानानं मतदान होतं. त्याचप्रमाणे मतदान व्हाव अशी आमची मागणी होती, असेही अजित पवारांनी सागितले. मात्र पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी संघर्ष दिसून आला आहे.