Ajit Pawar and Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले. या बंडखोरीनंतर अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मिळाला तर शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) असे पक्षाला नवीन नाव घ्यावे लागले. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष बीड जिल्ह्याकडे लागले आहे. त्यावेळी बीड जिल्ह्यातील शरद पवार गटातील आमदाराने अजित पवार यांची भेट घेतली आहे. पुण्यातील जुन्नर बाजार समितीत अजित पवार यांची आमदार संदीप क्षीरसागर यांनी गुप्त भेट घेतली. यानंतर राजकीय क्षेत्रात चर्चा सुरु झाली आहे. दरमयान आमदार क्षीरसागर यांच्या भेटीसंदर्भातील प्रश्नावर अजितदादा पत्रकारांवर संतापले.
बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची कार्यकारणी बरखास्त करण्याचा प्रकार शनिवारी घडला. बीड राष्ट्रवादी काँग्रेस भवन कार्यालयात चार तास झालेल्या बैठकीनंतर कार्यकारणी बरखास्त करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला. बैठकीला खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के उपस्थित होते. त्याचवेळी आमदार संदीप क्षीरसागर आणि अजित पवार यांच्या भेटीची बातमी रविवारी समोर आली.
संदीप क्षीरसागर यांच्या भेटीसंदर्भातील प्रश्नावर अजित पवार चांगलेच संतापले. अजित पवार म्हणाले, तुम्ही इतके वेडा आहात. मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. ते विरोधी पक्षाचे आमदार असले तरी त्यांच्या शहरात २१ दिवसांपासून पिण्यासाठी पाणी नाही. ते सांगायला ते आले होते. मी त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहे. त्यामुळे ते मला भेटले. मी त्या विषयावर बीडमध्ये बोललो आहे. पाणी प्रश्नावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.
संदीप क्षीरसागर म्हणाले, अजितदादांकडे बीडचे पालकत्व आहे. बीडचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्या विषयावर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोललो होतो. परंतु तो विषय अजून मार्गी लागला नव्हता. त्यामुळे पुन्हा अजितदादांना भेटलो आणि हा विषय त्यांच्या कानावर टाकला. तसेच एक विषय वाल्मिक कराड याचाही होता. या प्रकरणात गुन्हा दाखल व्हायला उशीर झाला. त्यामुळे त्यांच्यावर वरदहस्त असल्याचे दिसते. या प्रकरणात दोन चार महिन्यांसाठी सरकारने फास्ट ट्रॅकवर कारवाई केली, अशी मागणीही केली. तसेच नैतीकता दाखवून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, असे संदीप क्षीरसागर यांनी म्हटले.