मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात चांगलीच जुंपलीय. MPSC बद्दल प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री शिंदे चुकून निवडणूक आयोग असं बोलले. त्यावरुन अजितदादांनी शिंदेंना चांगलेच चिमटे काढले. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांबरोबर मी स्वत: काल बोललो. ते नवीन जी पद्धत आहे. ती पद्धत 2025 पासून लागू करण्याची मागणी जी होती. त्याप्रमाणे निवडणूक आयोगाला आम्ही पत्र दिलेलं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्यावरु अजित पवार यांनी टोला लगावला. “एमपीएससीची पोरं उपोषणाला बसतायत आणि टीव्हीला सांगतायत निवडणूक आयोगाकडे पाठवतो. अरे निवडणूक आयोगाकडे काय पाठवतो? काय राज्याचे मुख्यमंत्री आहेत राव तुम्ही”, असा टोला अजित पवारांनी लगावला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणूक आयोग असं म्हणाले. मुख्यमंत्र्यांकडून अनावधानाने हा उल्लेख झाला आणि तोही तब्बल 3 वेळा. अजित पवारांनी चिंचवडमधल्या सभेत याचा उल्लेख केला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना चांगलेच चिमटे काढले. दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदेंनीही आपण केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय.
“बघा चुकून अनावधानाने एमपीएससीच्या ऐवजी निवडणूक आयोग, म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग त्याच्याऐवजी निवडणूक आयोग असा शब्द माझ्या तोंडून निघालेला आहे. आता निवडणूक आयोग..आयोग..आजपण सुप्रीम कोर्टात तेच चालू होतं.. चुकून अनावधानानं झालेलं आहे”, असं स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिलं.
काही दिवसांपूर्वी अजित पवारांचंही एक वक्तव्य चांगलंच व्हायरल झालं होतं. सावित्रीबाई फुलेंच्या ऐवजी सावित्रीबाई होळकर असा उल्लेख अजित पवारांनी अनावधानानं केला होता. आणि नंतर स्पष्टीकरणही दिलं होतं.
“कधीकधी माणसाकडून एखादी चुकभूल होते. अजित पवार सावित्रीबाई फुलेंना सावित्रीबाई होळकर म्हणाले होते. सावित्रीबाई होळकर हे चुकून बोललो. त्याच्यात असा काय गुन्हा केला होता? असं काय आकाशपाताळ एक झालं. खरंतर मी अनेक महत्वाच्या पदावर काम केलं आहे. असं माझ्याकडून व्हायला नको. पण बोलण्याच्या ओघात झालं. नंतर मी दिलगीरीही व्यक्त केली”, असं अजित पवार म्हणाले होते.
मुख्यमंत्र्यांनी एमपीएससी ऐवजी निवडणूक आयोग म्हटल्यानं अजित पवारांनी त्यांना चांगलंच घेरलंय. आजकाल सोशल मिडीयाचा जमाना आहे. त्यामुळं कुणीही एखादं वक्तव्य केलं तर ते अवघ्या काही मिनिटात व्हायरल होतं. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबाबतही तेच झालं. आणि त्यांनाही स्पष्टीकरण देण्याची वेळ आली.