ज्यांच्याकडे जे आमदार आहेत, त्या बहुतांश जागा त्याच पक्षाकडे राहतील यावर महायुतीत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. फक्त जिथं जिंकण्याची क्षमता इतर उमेदवारात आहे अशा काही जागांचा या सूत्राला अपवाद असल्याचंही अजितदादांनी सांगितलं. महायुतीत जर हे सूत्र कायम राहिलं तर भाजपला 18 आणि शिंदेंच्या शिवसेनेला 8 अशा एकूण 26 जागांवर अजितदादांच्या राष्ट्रवादीसाठी पाणी सोडावं लागेल. कारण 2019 मध्ये आता अजित पवारांसोबत सत्तेत गेलेले 18 आमदार भाजपला तर 8 आमदार आता शिंदे गटातल्या नेत्यांना पराभूत करुन विधानसभेत पोहोचले आहेत. अहेरी, आष्टी, तुमसर, कोपरगाव, अर्जुनी, फलटण, वाई, वडगाव शेरी, हडपसर, पुसद, अमळनेर, उदगीर, इंदापूर, परली, कागल, अकोले, मावळ आणि माजलगाव या 18 ठिकाणी भाजपला पराभूत करुन आता अजितदादांसोबतचे आमदार विजयी झाले आहेत.
चिपळूण, नगर, जुन्नर, मोहोळ, शिंदखेडराजा, कळवण, अणुशक्तीनगर आणि खेड या ८ विधानसभांमध्ये अजितदादांचे आमदार आता शिंदे गटात असलेल्या लोकांविरोधात जिंकून आले आहेत. तूर्तास तरी भाजप नेत्यांनी या सूत्रास योग्य ठरवत अजित पवार यांच्या मागणीला योग्य ठरवलं आहे. मात्र अजित पवारांनी सिंटिग जागा हा शब्द वापरलाय आणि बावनकुळे सीट हा शब्द वापरत आहेत. सिटिंग जागेचा अर्थ विद्यमान आमदाराची जागा, तर सीटचा अर्थ फक्त लढवलेली जागा असा होतो. शब्दामधला फरक फार छोटा असला तरी अशाच काही शब्दांच्या अर्थावरुन 2019 ला शिवसेना-भाजपमधलं भांडण ताटातुटीस कारणीभूत ठरलं होतं.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला 105, शिवसेनेला 56 जागा मिळाल्या होत्या. तर राष्ट्रवादीला 54, तर काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. 13 जागांवर अपक्षांनी निवडणूक जिंकली होती. हितेंद्र ठाकूर यांच्या ‘बहुजन विकास आघाडी’ला 3 जागा मिळाल्या होत्या. प्रहार जनशक्ती, एमआयएम, समाजवादी पक्ष यांना प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत. राज ठाकरे यांच्या मनसेला एक जागा मिळाली होती. माकप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पक्ष, शेकाप, रासप, स्वाभिमानी या सर्व पक्षांना एक-एक जागा जिंकता आली होती.
आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बंडखोरी झाल्यानंतर कोणाला किती जागा मिळतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.