फक्त 3 जागा मिळणार असल्याची चर्चा, अजित पवार तातडीने दिल्लीला जाणार – सूत्र

| Updated on: Mar 06, 2024 | 7:26 PM

महायुतीत सध्या जोरदार हालचाली सुरु आहेत. महायुतीच्या जागावाटपाबाबत सातत्याने बातम्या समोर येत आहे. विशेष म्हणजे जागावाटपाबाबत निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते दिल्लीला गेले आहेत. असं असताना आता अजित पवारही अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

फक्त 3 जागा मिळणार असल्याची चर्चा, अजित पवार तातडीने दिल्लीला जाणार - सूत्र
Follow us on

प्रदीप कापसे, Tv9 प्रतिनिधी, नवी दिल्ली | 6 मार्च 2024 : महायुतीत सध्या जोरदार हालचाली घडत आहेत. नुकतंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत चर्चा केली. अमित शाह यांच्या उपस्थितीत महायुतीच्या दोन बैठका झाल्या. या बैठकांमध्ये शिंदे गटाला 8 तर अजित पवार गटाला केवळ 3 जागा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे या बैठका अद्याप संपलेल्या नाहीत. याबाबत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेते दिल्लीला गेले आहेत. दिल्लीत याबाबत अंतिम फैसला होण्याचे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे अजित पवार गटाला तीन जागा मिळणार असल्याच्या चर्चांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार 2 दिवसांनंतर दिल्लीला जाणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे देखील दिल्लीत जाणार आहेत. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. अमित शाहांच्या भेटीत जागावाटपावर अंतिम निर्णय होणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

बैठकीत काय चर्चा होणार?

अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल दोन दिवसांनी दिल्ली जाणार आहेत. अजित पवार गटाकडून अमित शाह यांच्या भेटीचा वेळ मागण्यात आली आहे. त्यानुसार हे दोन्ही नेते अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या भेटीत जागावाटपाबाबत अंतिम चर्चा केली जाणार आहे. राष्ट्रवादी किती जागांवर निवडणूक लढवू इच्छित आहे त्याबाबत अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल अमित शाह यांना माहिती देणार आहेत. त्यानंतर जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होईल. पण सकाळपासून अजित पवार गटाला कमी जागा मिळणार अशी चर्चा सुरु आहे. या चर्चेनंतर अजित पवार स्वत: दिल्लीला अमित शाहांच्या भेटीला जाणार आहेत.

शिंदे गटाला ‘या’ जागा मिळू शकतात

  1. दक्षिण मध्य मुंबई
  2. कल्याण
  3. हातकणंगले
  4. रामटेक
  5. बुलढाणा
  6. शिर्डी
  7. नाशिक
  8. मावळ

राष्ट्रवादीचाला ‘या’ तीन जागा मिळू शकतात

  1. बारामती
  2. रायगड
  3. शिरुर