लोकसभेचा निकाल लागून २ महिने झाले आहेत. आता विधानसभा २ महिन्यांवर आहे. अशावेळी अजित पवारांनी एक मोठी कबुली दिली आहे. बारामतीत बहीण सुप्रिया सुळेंविरोधात पत्नी सुनेत्रा पवारांना उभं करणं ही चूक होती. घरात राजकारण आणायला नको होतं. असं अजित पवार म्हणाले आहेत. लोकसभेवेळी सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल करणाऱ्या अजित पवारांनी विधानसभेच्या तोंडावर मोठी कबुली दिलीये. प्रचारात आपल्याला पवार कुटुंबानं एकटं पाडल्याचा आरोप करणाऱ्या दादांनीच आता मात्र आपण घरात राजकारण आणायला नको होतं., अशी स्वतःच खंत व्यक्त केली आहे.
एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीवेळी अजित पवारांनी म्हटलं की, राजकारण घरात घुसून द्यायचं नसतं. मागे मात्र माझ्याकडून थोडीशी चूक झाली. मी माझ्या बहिणीविरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस उभं केलं गेलं. पार्लमेंट्री बोर्डानं निर्णय घेतला. परंतू आता एकदा बाण सुटल्यावर आपण काहीच करु शकत नाही. पण आज माझं मन मला सांगतंय तसं व्हायला नको होतं.
राग आला तरी जागच्या जागी सडेतोड बोलणाऱ्या अजित पवार यांच्यातला हा बदल लक्षणीय आहे. विरोधकांच्या आरोपांनुसार अजित पवारांमधला हा बदल प्रचारासाठी नेमलेल्या कंपनीच्या स्क्रिप्टनुसार घडतो आहे. कारण, लाडकी बहीण योजनेवरुन महायुतीला पुन्हा सत्तेत परतण्याचा विश्वास आहे.
अजित पवारांच्या बॅनरवर बहिणींसाठी वादा, एकच अजितदादा यासारखे स्लोगन्स दिसत आहेत. मात्र त्याचवेळी लोकसभेला लाडकी बहीण आठवली नव्हती का, अशी टीका विरोधकांकडून झाल्यानंतर अजित पवारांनी सुळेंविरोधातली उमेदवारी चूक होती. असं म्हणून त्या टीकेतली हवा काढल्याचं बोललं जातंय.
लोकसभा निकालानंतर अजित पवारांच्या प्रचार पॅटर्नमध्ये आमूलाग्र बदलही दिसतोय. संपूर्ण पक्षाचा लूक गुलाबी झाला आहे. अजित पवार भाषणाला आलेल्या महिलांच्या सभेनंतर आवर्जून भेटी घेत आहेत. मुलींसाठी मोफत शिक्षणाच्या योजनेबद्दल विचारपूस करत आहेत.
शेताच्या बांधावर महिलेला लाडकी बहिणी योजना कुणी आणली म्हणून प्रश्नही करत आहेत.
संघ-भाजप विचारांच्या लोकांनी लोकसभा पराभवाचं खापर अजित पवारांवर फोडलं होतं. मात्र त्यानंतर जवळपास 7 वेळा अजित पवारांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे एकप्रकारे भाजपलाच त्या आरोपांवरुन उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
बारामतीत येवून भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी वाजवलेल्या चुटकीचा फटका बसल्याचं अजित पवार म्हणाले. भाजप नेते विखेंच्या त्रासामुळे निलेश लंके सोडून गेले., अन्यथा नगरच्या जागेवर विजय झाला असता. असं दादांनी म्हटलं. माढ्याची जागा आम्ही लढवली असती तर तिथं सहज विजय शक्य होता., मात्र भाजपनं ती जागा लढवली. धाराशीवची जागा इच्छा नसतानाही भाजपनं आम्हाला दिल्याचं अजितदादा म्हणाले होते. कांदा निर्यातबंदीचा मुद्दा केंद्राच्या हाती असून दादांनी त्याबद्दल माफी मागून स्वतःची बाजू सुरक्षित केली.
त्याच्या दुसऱ्याच दिवशी मोदींनी पुण्यात येवून शरद पवारांना भटकती आत्मा म्हणून वापरलेल्या शब्दाचा फटका बसल्याचंही दादा म्हणाले. लोकसभेवेळी सुळेंविरोधात दादांच्या घरातूनच उमेदवारीसाठी भाजपचा आग्रह असल्याच्या चर्चा होत्या. त्यावर आता घरात राजकारण आणून आपण चूक केल्याची कबुली अजित पवारांनी दिली आहे.
लोकसभा प्रचारात बहिणीची मिमिक्री ते विधानसभेच्या तोंडावर त्याच बहिणीविरोधात उमेदवार दिल्याची खंतवजा दिलगिरी. अवघ्या ३ महिन्यात मिमिक्री ते दिलगीरीपर्यंतचा हा फरक लाडकी बहिण योजनाच केंद्रस्थानी ठेवून झालाय का. असा प्रश्न विचारला जातोय. कारण लोकसभेला स्वतःच्या बहिणीविरोधात पत्नीला उभं करणं आणि विधानसभेला लाडक्या बहीण योजना घेवून सामान्य महिलांपुढे जाणं. यातला विरोधाभास अजित पवारांच्या कबुलीनं कमी होईल का., हे पाहणं महत्वाचं असेल.