मंत्री धनंजय मुंडे यांच्यामागचं शुक्लकाष्ट काही केल्या कमी होताना दिसत नाही. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना सीआयडीने अटक केली आहे. या प्रकरणात विरोधकांकडून थेट धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला जातोय. भाजप आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत या प्रकरणाची इत्यंभूत माहिती दिली. तसेच आमदार जितेंद्र आव्हाड यांनीदेखील विधानसभेत रोखठोक भूमिका मांडली. यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे सातत्याने निशाणा साधण्यात आला. तसेच विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात आहे. विशेष म्हणजे आता त्यांच्या पक्षातील आमदारांकडूनही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यामागचं संकट काही कमी होताना दिसत नाही.
“मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या”, असं मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी मागणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे आमदार मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही असल्याची माहिती मिळत आहे. धनंजय मुंडे यांची आरोपी वाल्मिक कराड याच्यासोबत असलेल्या जवळकीमुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठवाड्यातील आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी केल्याची सूत्रांची माहिती आहे. आगामी काळात मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागू नये, त्याचबरोबर ही एकाधिकारशाही मोडीत काढावी, अशी मागणी मराठवाड्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजित पवार यांच्याकडे केल्याची सूत्रांची माहिती आहे.
विशेष म्हणजे तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदापासून दूर राहावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी याआधीदेखील केली आहे. “वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहे. या प्रकरणाचा पूर्ण तपास होईपर्यंत आणि आरोपींना शिक्षा होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदापासून दूर राहावं, नाहीतर पक्षश्रेष्ठींनी त्यांना काढावं”, असं प्रकाश सोळंके माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर म्हणाले आहेत. मराठवाड्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे एकूण 5 आमदार आहेत. यामध्ये बाबासाहेब पाटील, संजय बनसोडे, राजू नवघरे, राजेश विटेकर आणि प्रकाश सोळंके यांचा समावेश आहे.