पुणे : 19 ऑगस्ट 2023 | अजितदादांनी भाजपसोबत जाण्यामागची आपली संवेदना सांगितली. हा महाराष्ट्र शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. सर्वधर्मीयांना सोबत घेऊन महाराष्ट्राची अस्मिता निर्माण केली. अलेक्झांडर आणि नेपोलियनकडे सुविधा असतील. मात्र, स्वातंत्र्याचा पहिला हुंकार हा शिवाजी महाराजांनी दिला. आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो. त्यांचे घटक झालो आहोत. आमची मुळ विचारसरणी ही शाहु, फुले आंबेडकरांची आहे. आम्ही आमच्या विचाराशी जराही तडजोड करणार नाही, असे राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.
अजित पवार गटाच्या पुण्यातील कार्यकारिणी नियुक्ती प्रमाणपत्राचे वितरण सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर याही उपस्थित होत्या. काहीजण म्हणतात पक्षानं मोकळा श्वास घेतला. एजंट बाहेर गेले. एवढे दिवस तुम्ही एजंटमध्ये काम करत होतात. तेव्हा तुम्हाला सुचल नाही का ? दादांवर टिका केली तर आम्ही खपवून घेतला जाणार नाही, अशी टीका रुपाली चाकणकर यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता केली.
पुणेकर पुणेरी पाट्यांसाठी प्रसिद्ध आहेत. जसे ते रसिक आहेत तसेच उत्कृष्ट दाद देणारे आहेत हे गर्दीवरून लक्षात येतं. पुण्यात जे पिकतं ते विकतं. अजित दादांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. मी आंदोलन केलं. 3 दिवसांची पोलीस कस्टडी लागली. मात्र, ज्यांच्यासाठी आंदोलन केलं त्यांना फोन केला असता त्यांनी फोन घेतला नाही. परंतु. दादांनी मात्र जामीन होईपर्यंत पाठपुरावा केला, असेही रुपाली चाकणकर म्हणाल्या.
अजितदादांनी वेगळा निर्णय घेतला. त्याला आम्ही पाठींबा दिला. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर त्यांनी जी जबाबदारी दिली ती स्विकारली. 5 तारखेला आम्ही अधिवेशन घेतलं. ते यशस्वी झालं. त्यामुळे दादांनी घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितलं.
पुणे शहरात अजितदादांनी दाखवलेली मेहनत त्यामुळेच पुणेकरांनी त्यांच्यावर विश्वास टाकला. पुणे सहजासहजी कोणाला स्विकारत नाही. 2019 ला शिवसेना आणि भाजपच्या विरोधात लढलो. निकाल लागला तेव्हा शरद पवारांनी मेहनत घेतली आणि मविआ निर्माण केली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालं. ज्यांचा वैचारिक विरोध आहे त्यांच्यासोबत गेलो आणि मग भाजपसोबत गेलो तर आक्षेप असण्याचं कारण काय ? हा युक्तीवाद आम्ही लोकांसमोर मांडू.
दादांनी इथं यायचं ठरवल्यावर काम होईल. आजची गर्दी पाहता हा फक्त ट्रेलर आहे असे मानतो. कोणी कार्यालयातील अजित दादांचा फोटो काढला. पण, कोट्यवधी लोकांच्या मनात अजित पवार आहेत. इकडचा फोटो तिकडं करून काय होत असेल तर त्यांचा भ्रमनिरास होईल. आता आंदोलन करण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर येणार नाही. कारण आपण आता सत्तेमध्ये आहोत. आता आपला विचार ठरला थांबायचं नाही, असेही तटकरे यांनी यावेळी म्हणाले.