कडाक्याचं ऊन, त्यामुळे होणारी अंगाची लाहीलाही अन् घामाच्या धारा यातून आता अवघ्या तीन-चार दिवसात सुटका होणार आहे. येत्या तीन ते चार दिवसात मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार आहे,. हवामान खात्याने त्याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला उकाड्यापासून दिलासा मिळणार आहेच, शिवाय धरणांनाही जीवदान मिळणार आहे. मुंबईसह राज्यातील काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या होत्या. आता चार दिवसात पाऊस सक्रिय होणार असल्याने राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
काल राज्यात अनेक ठिकाणी पावसाच आगमन झालं आहे. म्हणजेच राज्यात मान्सून आला आहे. पुढील 3 ते 4 दिवसात राज्यातील अनेक भागात मान्सून दाखल होईल. पुढील 3 दिवसात मुंबई कोकणासह राज्यातील अनेक जिल्ह्यात मान्सूनच्या सरी बरसणार आहेत. पुढील पाच दिवसांसाठी मुंबईसह रायगड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये रविवारच्या सुमारास अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणात देखील पुढील 3 दिवसात जोरदार पाऊस बरसणार आहे, अशी माहिती एमआयडीचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी दिली. त्यामुळे आता चाकरमान्यांना छत्र्या आणि रेनकोट घेऊनच पुढच्या आठवड्यापासून घराबाहेर पडावं लागणार आहे.
पुणे शहरासह जिल्ह्यात पडणारा पाऊस हा मान्सूनपूर्व पाऊस आहे. पुण्यात अजूनही मान्सूनची प्रतीक्षा आहे. शेतकऱ्यांनी कामाला सुरुवात करायला हरकत नाही. पण पेरणीसाठी घाई करू नका. पेरणीसाठी थोडसं थांबा. यंदाचा पाऊस चांगला असणार आहे, असं होसाळीकर यांनी सांगितलं.
दरम्यान, रत्नागिरीत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 10 जूनपर्यंत हा अलर्ट आहे. यावेळी ताशी 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. येत्या 24 तासात 28.80 मिमी पाऊस पडला आहे. सध्या रत्नागिरीत वातावरण ढगाळ आहे. नागरिकांनी सावधानता बाळगावी, असं आवाहन हवामान खात्याने केलं आहे.
तर, परभणीत आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. जूनच्या सुरुवातील पाऊस होणार, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला होता. मात्र 7 जून उलटला तरी परभणीकरांसहित शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे. भीषण दुष्काळाचा सामना करणारे परभणीकर आतुरतेने पावसाची वाट पाहत आहेत.
राज्यामध्ये मान्सून दाखल झाला आहे. बीड जिल्ह्यातही दोन दिवसापासून तुरळक पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची, मशागतीची कामे सुरू केली आहेत. जिल्ह्यात भीषण दुष्काळ होता. त्यामुळे आता खरीप हंगामासाठी बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत शेतातील सर्व कामे उरकताना पाहायला दिसत आहे.