साहित्य संमेलनात राजकीय राबता, समारोपाला पवार, मुख्यमंत्रीही लावणार हजेरी; उद्घाटक मात्र ठरेना!

| Updated on: Nov 16, 2021 | 10:29 AM

उद्घाटक म्हणून गीतकार गुलजार आणि जावेद अख्तर यांच्या नावांना हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला आहे. ते वारंवार ज्या भूमिका घेतात, त्याला या संघटनांचा विरोध आहे.

साहित्य संमेलनात राजकीय राबता, समारोपाला पवार, मुख्यमंत्रीही लावणार हजेरी; उद्घाटक मात्र ठरेना!
शरद पवार आणि उद्धव ठाकरे.
Follow us on

नाशिकः नाशिकमध्ये होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर यंदा राजकीय राबता पाहायला मिळणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आहेत. समारोपासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही (Uddhav Thackeray) संमेलन काळात हजेरी लावतील, असे संकेत भुजबळ यांनी दिलेत. संमेलनासाठी नाशिकमधील आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटी कॅम्पसमध्ये जोरदार तयारी सुरूय. कविवर्य कुसमाग्रज नगरी सज्ज करण्यात येत आहे. भुजबळ यांनी या कामाचा आढावा घेत काही सूचना केल्या आहेत.

गुलजार, अख्तरांना विरोध

साहित्य संमेलन 3 ते 5 डिसेंबर दरम्यान होणार आहे. प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ व विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. उद्घाटक म्हणून ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, गीतकार गुलजार, गीतकार जावेद अख्तर, गायिका आशाताई भोसले यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, यातील गीतकार गुलजार आणि जावेद अख्तर यांच्या नावांना हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला आहे. ते वारंवार ज्या भूमिका घेतात, त्याला या संघटनांचा विरोध आहे. त्यामुळे उद्घाटनाला कोण येणार, याचा पेच अजून कायम आहे. मात्र, समारोप शरद पवारांच्या हस्ते होईल. या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही हजेरी लावणार आहेत.

भुजबळांच्या सूचना

साहित्य संमेलनाचे आयोजन ही नाशिकचे नाव उंचावण्यासाठी लाभलेली महत्त्वाची संधी असून, हे केवळ साहित्य संमेलन नाही तर शहर व जिल्ह्यासाठी हा महत्त्वाचा उत्सव आहे. सारस्वतांच्या हा मेळावा अधिक दर्जेदार व्हावा त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन व आयोजकांनी नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री व साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. संमेलनाच्या आयोजनाबात भुजबळांनी बैठक घेतली. यावेळी माजी आमदार हेमंत टकले, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महापालिका आयुक्त कैलास जाधव, मुख्याधिकारी लीना बनसोड उपस्थित होते.

शहरातून शटल बस

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नाशिक शहर व परिसर सुशोभीकरणावर अधिक भर देण्यात यावा. आपल्या दर्जेदार व्यवस्थेतून येणाऱ्या साहित्यप्रेमींना ज्या सुविधा मिळतील त्यातून नाशिकचे नाव देशपातळीवर पोहचणार आहे. नागरिकांना येण्या-जाण्यासाठी शटल बस सेवा उपलब्ध करून देण्यात यावी. साहित्य संमेलनाचा उत्सव दर्जेदार होण्यासाठी नागरिकांचे सहकार्य तितकेच महत्वाचे असणार आहे. स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक आदरतिथ्य करणारे नाशिक याद्वारे अवघ्या साहित्य विश्वासमोर जाणार आहे.

इतर बातम्याः

ते मानानं मोठे, पण त्यांनी काहीही सूचवावं हे चालणार नाही; अभिनेते गोखलेंच्या वक्तव्यावर पेडणेकरांचे शेलके ताशेरे

प्लास्टिकच्या घोड्यावर बसून सिनेमा करणाऱ्या नटीला पद्मश्री देणे हिंदुस्थानचा अपमान; कारवाई करून विषय संपवा, मुंबईच्या महापौरांची मागणी