बीड लोकसभेत बोगस मतदानाचा आरोप होतोय. रोहित पवारांनी ५ व्हिडीओ ट्विट करुन निवडणूक आयोगाला सवाल केले आहेत. धनंजय मुंडेंनी यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही., तर पंकजा मुंडेंनी आरोप फेटाळून लावले आहेत. त्याचदरम्यान एक पत्रकार आणि मतदान अधिकारी यांची एक कथित ऑडिओ क्लिप बीड जिल्ह्यात सर्वाधिक व्हायरल झाल्यानं विविध चर्चांना पेव फुटलंय.
बीडमध्ये बोगस मतदान झाल्याच्या आरोपांवरुन विविध व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप्स व्हायरल होत आहेत. रोहित पवारांनी बीडच्या परळीत काही गावांमध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप केलाय. त्यांनी काही व्हिडीओ ट्विट करुन हा आरोप केलाय., व्हिडीओत शरद पवार गटाचे नेते बबन गीते मतदान केंद्रातल्या कारभारावरुन अधिकाऱ्यांवर रागावताना दिसत आहेत.
यावर रोहित पवारांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, परळीत आता यापुढे लोकशाही नव्हे तर गुंडाराज चालणार का? हे असेच सुरू राहिले तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश व्हायला वेळ लागणार नाही.निवडणूक आयोग या गुंडगिरीला चाप लावणार आहे की केवळ बघ्याची भूमिका घेणार आहे?
दरम्यान बीड जिल्ह्यात पत्रकार आणि मतदान केंद्रावरचा अधिकारी यांच्यातली एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. ज्यात मतदान अधिकारीच गावातलं बुथ ताब्यात घेतलं गेल्याचं सांगतो आहे.
बीडच्या मतदानाच्या आदल्या दिवशीही धनंजय मुंडे आणि मतदानासाठी येणाऱ्या काही लोकांमधल्या संवादांची कथित व्हायरल क्लिप चर्चेत राहिली. रोहित पवारांच्या या ट्विटवर पंकजा मुंडेंनी थेट उत्तर न देता कुणाला काही तक्रार असल्यास निवडणूक आयोगाकडे तक्रार
करण्याचा सल्ला दिलाय. धनंजय मुंडेंची अद्याप प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. मात्र बजरंग सोनवणे समर्थकांनी धनंजय मुंडेंद्वारे बोगस मतदान केलं जातं होतं., यासाठी त्यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियातून व्हायरल केलाय.
त्याआधी अपक्ष उमेदवाराला महामंडळाच्या अध्यक्षपदाचा शब्द देवून पंकजा मुंडेंनी अर्ज मागे घेण्यासाठीचा फोनकॉल व्हायरल झाला होता.,
हा संवाद व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडेंशी संबंधित उमेदवाराचं आधीच बोलणं झालं होतं.,असं पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.