नांदेड – महावितरण कंपनी (MSEDCL) मार्फत घेण्यात आलेल्या विद्युत सहाय्यक भरतीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप नांदेड (Nanded) मधील उमेदवारांनी केला आहे. 2019 मध्ये विद्युत सहाय्यक (Electrical Assistant) पदाच्या पाच हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत जवळपास अडीच हजार जागा भरण्यात आल्या आहेत. उर्वरित अडीच हजार जागा तरी नियमानुसार भरण्यात याव्या अशी मागणी उमेदवारानी केली आहे. उमेदवारांचे बेस्ट ऑफ फाईव्हचे गुण गृहीत न धरता. एकूण गुण गृहीत धरण्यात येणार असल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले होते. त्यावेळी जवळपास सव्वा लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. निवडीची पहिली यादी लावण्यात आली, त्यात काही उमेदवारांच्या बाबतीत गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहे. काही पात्र विद्यार्थ्यांचे बेस्ट ऑफ 6 ऐवजी बेस्ट ऑफ फाईव्हचे गुण ग्राह्य धरण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे.
काही विद्यार्थ्यांनी 2021 चे शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र लावले. त्यांचीही निवड करण्यात आली आहे. आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा 10 % आरक्षित कोटा भरण्यात आला नाही. धक्कादायक बाब म्हणजे निवड यादी लावण्यापूर्वी प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली. तसेच प्रकल्पग्रस्त ,भूकंपग्रस्त, माजी सैनिक उमेदवारांवर अन्याय झाल्याचा आरोप या उमेदवारानी केला आहे. त्यामुळे विद्यार्थी न्याय मागत आहेत. त्याचबरोबर आतातरी किमान उरलेली पदं नियमानुसार भरा अशी मागणी करीत आहेत. झालेल्या घोटाळ्याची सरकार दरबारी दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. तसेच पुन्हा परीक्षा घ्याव्यात अशी उमेदवारांची मागणी आहे.
नांदेडच्या महावितरण कंपनीत पाच हजार जागा भरायच्या होत्या. त्यापैकी अधिकाऱ्यांनी आपल्या मनमर्जीने अडिच हजार पदे भरली आहेत. जाहीरातीत दिल्याप्रमाणे कोणतीही नियमावली अधिकाऱ्यांनी पाळली नसल्याची उमेदवारांनी तक्रार केली आहे. या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी उमेदवारांची इच्छा आहे. तसेच उर्वरित अडीच हजार पदं तरी किमान नियमानुसार भरावी अशी उमेदवारांची मागणी आहे.