मुंबई : राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ( Ambadas Danve ) यांनीच एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांना धक्का दिला आहे. एकीकडे ठाकरे गटाचे खासदार यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला जाईल अशी स्थिती असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच विधानपरिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांनाच कोंडीत पकडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विरोधी पक्षाच्या नेत्यांना देशद्रोह्यांबरोबर चहापान टाळलं असं विधान करणं चांगलंच भोवणार असं दिसतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी चहापान टाळलं होतं.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सत्ताधारी पक्षांनी चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. त्यामुळे विरोधी पक्षांनी चहापान टाळल्यावरुन टीका केली होती.
टीका करत असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशद्रोह्यांबरोबर चहापान टाळलं असं विधान केले होते. त्यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे.
विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी हक्कभंग सादर केला आहे. खरंतर आजच्या दिवशी भाजपसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांनी संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल करण्याची मागणी केली होती.
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदार यांच्यावर टीका करत असतांना चोरमंडळ म्हंटलं होतं. त्यावर संजय राऊत यांनी नंतर स्पष्टीकरणही दिलं मात्र, त्यावरून दोन्ही सभागृहात हक्कभंग दाखल करण्यासाठी मोठा गोंधळ घालण्यात आला होता.
भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादी कोंग्रेस, कॉंग्रेस यांच्यासह इतर नेत्यांनी संजय राऊत यांच्याबद्दल निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर हक्कभंग दाखल करून त्यांना तात्काळ अटक करा असेही म्हंटले आहे.
याशिवाय भाजपचे आमदार नितेश राणे यांनी तर 10 मिनिट सुरक्षा काढून घ्या म्हणत उद्या संजय राऊत दिसणार नाही अशी धमकीच दिली होती. त्यावरून संपूर्ण सभागृहात वातावरण तापलेले असतांना दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाने मोठी चाल खेळली आहे. त्यामध्ये थेट एकनाथ शिंदे यांनाच कोंडीत पकडले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चहापान टाळलं असं सांगत असतांना विरोधीपक्षाच्या नेत्यांना देशद्रोही म्हंटलं होतं. तीच बाब हेरून अंबादास दानवे यांनी थेट हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडल्याचे दिसून येत आहे.