अंबाजोगाई/लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ रविवारी पहाटे कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमधील सर्वजण लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील जगलपूर इथले होते. त्यांची नावं अद्याप समजू शकलेली नाहीत. शनिवारी रात्री उशीरा जगलपूर इथले चार जण कारने छत्रपती संभाजीनगरहून निघाले होते. रात्री सुरू असलेल्या मुसळधार पावसात अंबाजोगाई लातूर रोडवरील पाचपीर दर्गाजवळ त्यांच्या कारची आणि समोरून येणाऱ्या कंटेनरची जोरदार धडक झाली.
हा अपघात इतका भीषण होता की त्यात कारचा अक्षरश: चुराडा झाला आणि त्यातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात रविवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास झाला. सर्व मृतदेह अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच बर्दापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले.
अपघाताच्यावेळी मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे चालकाला समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. लातूरहून अंबाजोगाईकडे जाणारा चौपदरी रस्ता बर्दापूरच्या पुढे दुपदरी करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यावर सातत्याने अपघात होत आहेत. हा रस्ता लोखंडी सावरगावपर्यंत चौपदरी करावा अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.