सत्तासंघर्षाच्या निकालाआधी अमित शाह यांची शिंदे-फडणवीस यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा, आतली बातमी काय?

| Updated on: May 01, 2023 | 11:54 PM

मुंबईत रविवारी झालेल्या एका बैठकीची जोरदार चर्चा सुरु झालीय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली.

सत्तासंघर्षाच्या निकालाआधी अमित शाह यांची शिंदे-फडणवीस यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा, आतली बातमी काय?
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : सत्तासंघर्षाच्या निकालाआधीच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत एक महत्वपूर्ण बैठक घेतली. यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपच्या नेतृत्वानं आगामी निवडणुकीसाठी विश्वास व्यक्त केलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक झाली. अमित शाह रविवारी, एका दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. याचवेळी बंद दाराआड महत्वपूर्ण बैठक झाली.

भाजपचे आमदार पराग अळवणींच्या घरी बैठक झाली. जवळपास एक तास अमित शाह, शिंदे आणि फडणवीसांमध्ये चर्चा झाली. आगामी सर्व निवडणुका मुख्यमंत्री शिंदेंच्याच नेतृत्वात लढवण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात भाजप लोकसभा असो की मग विधानसभेच्या निवडणुका लढणार हे, tv9शी बोलताना स्वत: फडणवीसांनीही सांगितलंय. तर उद्धव ठाकरे आपल्या सभांमधून हाच सवाल भाजपला करतायत.

हे सुद्धा वाचा

बैठकीत नेमकी चर्चा काय?

सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टातला निकाल येत्या 15 दिवसांत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्तासंघर्षाच्या निकालाआधी अमित शाहांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. सत्तासंघर्षाचा निकाल बाजूने आला तर पुढची वाटचाल कशी असावी? सत्तासंघर्षाचा निकाल विरोधात गेल्यास काय करायचं? 16 आमदार अपात्र झाले तरी बहुमत सरकारकडे असणारच, त्यामुळे तर पुढचा मुख्यमंत्री कोण? यावर चर्चा झाल्याची शक्यता आहे.

खरं तर अमित शाहांसोबतची ही बैठक 29 एप्रिलला नागपुरात होणार होती. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटच्या उद्घाटनाच्या निमित्तानं अमित शाह नागपुरात येणार होते. पण ऐनवेळी अमित शाहांचा दौरा रद्द झाला. त्यामुळे रविवारी शाह-शिंदे आणि फडणीवासांमध्ये बैठक झाली. भाजपचं नेतृत्व तुमच्या पाठीशी भक्कमपणे आहे, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदेंना देण्यात आल्याचं कळतंय.

उद्धव ठाकरे यांची भाजप-शिंदे सरकारवर टीका

एकीकडे अमित शाह यांचा काल मुंबई दौरा पार पडला असताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले. “कोणीही मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी जो इशारा दिला होता तोच इशारा मी आता देतोय, जो कोणी महाराष्ट्रापासून मुंबई तोडेल त्याचे तुकडे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा आमचा जाहीर इशारा आहे. पण मुंबई तोडता येत नाही म्हणून मुंबईला मारुन टाकायचं. मुंबईची हत्या करायची. हे यांच्या भांडवलदार वृत्तीचे मनसूबे आहेत”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे यांच्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं. “मुंबई तुटू शकत नाही आणि हे स्वप्न कुणी पाहू नये. पण मुंबईकरांना मुंबई तोडणार म्हणून मतं मिळवण्याचा जो प्रयत्न कोणी करतोय त्यात ते यशस्वी होणार नाहीत. कारण मुंबईत आपण काम करतोय. मुंबईकर आज जाणून आहे की मुंबई बदलतेय”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.