अमरावतील लोकसभा मतदार संघात भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात एकीकडे महायुतीमधील शिवसेनेचे आनंदराव अडसूळ होते. दुसरीकडे प्रहारचे बच्चू कडू यांनी आपला उमेदवार जाहीर केला होता. नवनीत राणाविरुद्ध दोन्ही नेते माघार घेण्याच्या तयारीत नव्हते. परंतु अखेर आनंदराव अडसूळ यांनी माघार घेतली. अडसूळ यांनी माघार का घेतली? त्याचे कारण उघड केले आहे. अमित शाह यांच्यासोबत झालेल्या त्या बैठकीनंतर अडसूळ यांनी माघार घेतली. त्या बैठकीत अमित शाह यांनी अडसूळ यांना राज्यपाल करण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, असा दावा अडसूळ यांनी केला आहे.
आनंदराव अडसूळ यांनी सांगितले की, मला देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल करण्याचे सांगितले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मला बोलवले. त्यांनी अमरावतीची जागा भाजपला हवी असल्याचे सांगितले. महायुतीचा घटक पक्ष असल्यामुळे मी माघार घेतलीय त्यावेळी अमित शाह यांनी मला राज्यपाल करण्याचा शब्द दिला. बैठकीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुध्दा उपस्थित होते. आता मला काय देणार? ते पाहायचे आहे.
आनंदराव अडसूळ यांनी आता नवनीत राणा निवडूण येऊ शकते, असा दावा केला आहे. अमरावती लोकसभा मतदार संघात राणांविरोधात वातावरण होते. नवनीत राणांचे गेल्या 5 वर्षातील एकतरी काम दाखवा. होळीला आदिवासींच्या घरी जायचे, पोळ्या लाटायचा आणि नाटकबाजी करायची, असेच त्यांनी केले. मुस्लिम समाज माझ्याकडे आला आणि मला पाठिंबा दिला होता. नवनीत राणा यांना भाजपच्या कार्यकर्त्यांचा विरोध होता. यामुळे मी चांगल्या लिडने निवडून आलो असतो.
लोकसभा निवडणुकीत गजानन किर्तीकर यांनी पक्षविरोधात काम केले, असा आरोप भाजपकडून होत आहे. त्यावर आनंदराव आडसूळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मुलगा आणि वडील एकाच कार्यालयात बसतात. त्यात गजानन किर्तीकरांची काय चूक आहे. मला पण वाटत माझा मुलगा आमदार झाला पाहिजे. त्याला वाटत की मी मोठा झाला पाहिजे. किर्तीकरांसारखा मोठा नेता स्थानीक लोकाधिकार समितीचे काम करत आहे. बाळासाहेबांनी जे मंत्र दिलं होते त्यावर ते किर्तीकर काम करत आहे. प्रविण दरेकर मोठे नेते आहेत. त्यांनी चुकीचे विधान करू नये, असे ते म्हणाले. तसेच आशिष शेलार यांनी किर्तीकरांविरोधात पुरावा दाखवावा, असे आवाहन त्यांनी केले.