अमरावती : अमरावतीच्या उमेश कोल्हे यांची 21 जून रोजी हत्या करण्यात आली. याप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. आज शवविच्छेदन अहवाल आला. या अहवालात उमेश यांच्या शरीरावर 5 इंच रुंद, तर 7 इंच लांब जखमा असल्याचे स्पष्ट झालं. उमेश यांच्या मेंदूच्या नसांनाही इजा (The nerves of the brain) झाली आहे. तसेच अन्नाची नळी (the esophagus), श्वासोच्छवासाची नळीवरही जखमा आहेत. डोळ्याच्या रक्तवाहिनीवर (the blood vessels of the eyes) चाकूने हल्ला केल्याने इजा झाली आहे. इतक्या क्रूरपणे पाचही आरोपींनी उमेश यांची निर्घृण हत्या केली.
उमेश रात्री मेडिकल स्टोर्समधून घरी जात होते. पाच आरोपींनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. चाकूचे सपासप वार केले. त्यामुळं उमेश यांच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या होत्या. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्या जखमा किती खोल होत्या, हे स्पष्ट झालं. अशी निर्घृण हत्या करणाऱ्या पाचही आरोपींना तसेच मास्टरमाईंड व इतर एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
अमरावती उमेश कोल्हे हत्या प्रकरणी मुख्य सूत्रधार आरोपी शेख इरफान रहीम रहीम याला अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयात पोलिसांनी हजर केलं. उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणी आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आली. नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याने उमेश कोल्हे यांची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं. अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयात व पोलीस ठाण्यासमोर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. शेख रहीम शेख इरफान याला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. चार दिवस पोलीस कोठडीत इरफानची चौकशी होईल.
अमरावतीमध्ये नुपूर शर्मा यांना समर्थन केल्यामुळे उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. त्यात आता जे लोक नुपूर शर्मा यांना समर्थन देत आहेत, त्यांना धमकीचे फोन येऊ लागले आहेत. डॉ गोपाल राठी यापैकी एक आहेत. ज्यांनी नुपूर यांच्यासाठी आय सपोर्ट नुपूर शर्मा असं व्हॉट्सऍप स्टेटस ठेवलं होतं. त्यानंतर त्यांना धमकीचे मेसेज यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळं हे प्रकरण अतिशय गंभीर परिस्थितीत पोहचलं आहे.