अमरावतीमधून मोठी बातमी समोर येत आहे. अमरावतीत 100 पेक्षा जास्त महिलांना विषबाधा झाली आहे. अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसीमधील गोल्डन फायबर कंपनीत ही घटना घडली आहे. सर्व महिलांवर अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे अमरावतीत काही दिवसांपूर्वी एका शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता नांदगाव पेठ एमआयडीसीतील गोल्डन फायबर कंपनीत महिलांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटना अतिशय चिंताजनक आणि धक्कादायक आहे. कारण 100 पेक्षा जास्त महिलांना ही विषबाधा झाली आहे. त्यांच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही महिलांनी सांगितलेल्या माहितीनुसार, कंपनीतील पाणीतून किंवा नाश्तामधून ही विषबाधा झाल्याचा संशय आहे.
एका महिलेने सांगितलं की, “मला आज सकाळपासून त्रास होतोय. पाणी पिल्यापासून त्रास होतोय. सकाळपासून मळमळ होत आहे. तसेच उल्टी झाली आणि खूप पोट दुखत आहे.” दुसऱ्या एका महिलेने आपल्या कंपनीत जवळपास 700 महिला काम करत असल्याची माहिती दिली. दरम्यान, अनेक महिलांची प्रकृती गंभीर असल्याची देखील माहिती समोर येत आहे.
विशेष म्हणजे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महिलांना रुग्णालयात आणलं आहे. मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. “एकदम गंभीर घटना आहे. महिलांना सकाळी ९ वाजेपासून जेव्हा त्रास सुरु झाला, तर प्रत्यक्ष कंपनीने कुणाला बाहेर येऊ दिलं नाही तर डॉक्टर कंपनीत बोलवले. तर काही लोकांना सुट्टी दिली. काहींना सांगितलं तुम्ही डायरेक्ट घरी जा. मला काही मंडळी जेव्हा भेटले तेव्हा मी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात गेलो. पोलिसांना कंपनीत घेऊन गेलो. तिथे गेल्यावर कंपनीवाले बेजबाबदारपणे काम करत होते. कुणी आतमध्ये येऊ देत नव्हते. पोलीस स्वत: सर्वांशी बोलले आणि सर्वांना इथे रुग्णालयात घेऊन आलो”, अशी प्रतिक्रिया मनसेच्या पदाधिकाऱ्याने दिली. आता या प्रकरणात काही कारवाई केली जाते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.