महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेच्या अक्षरश: चिंधळ्या उडताना दिसत आहेत. महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना ताजी आहे. विशेष म्हणजे ही घटना ताजी असताना अमरावती शहरातून अतिशय धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. अमरावती शहरात दररोज हत्येच्या घटना समोर येत आहेत. अमरावतीत गेल्या 10 दिवसांमध्ये तब्बल 7 हत्येच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. संबंधित घटनांनंतर आता राजकारणही तापत आहे. पण या राजकारणानंतर गुन्हेगारांना जबर बसेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अमरावती शहरात हत्येचे सत्र सुरूच आहे. अमरावतीच्या चित्रा चौकात रात्री तरुणाची हत्या करण्यात आली. चाकूने पोटात सपासप वार करून शुल्लक वादातून ही हत्या करण्यात आली आहे. गोलू सुनील उसरेटे (वय 30 वर्ष) असं मृतक तरुणाचे नाव आहे. गोलू हा अमरावतीच्या रतनगंज येथील रहिवासी होता. विकी गुप्ता याने शुल्लक कारणावरून गोलूच्या पोटात चाकूने वार करून ही हत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी आरोपी विक्की गुप्ता याचा शोध सुरू केला आहे. घटनेनंतर तणाव निर्माण झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात रात्री 12.30 वाजता पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हत्यांच्या घटनांनी अमरावती शहर हादरले आहे. मागच्या 10 दिवसात 7 जणांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. अमरावती शहरातील पोलिसांची दहशत संपली आहे का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आमदार रवी राणा यांनी पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दरम्यान, काल रात्री गोलू उसरेटे या युवकाची हत्या झाल्यानंतर नातेवाईक आक्रमक झाले. हत्या करणाऱ्या आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका गोलूच्या समर्थक आणि नातेवाईकांनी घेतली.
आक्रमक नागरिकांनी बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या घराला घेराव घातला. यानंतर अमरावती शहरातील तडीपार गुंडांना पोलिसांनी अटक केली नाही तर आपण आंदोलन करणार, असा इशारा रवी राणा यांनी दिला. पोलिसांनी 5 वाजेपर्यंत आरोपींना अटक करावी. नाहीतर मी स्वतः पोलीस ठाण्यात येऊन आंदोलन करणार, असं रवी राणा म्हणाले.
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्र आणि अमरावतीची गती अशी केव्हा झाली नव्हती. दिवसाला दोन मर्डर होत आहेत. भर चौकात मर्डर होत आहेत. त्यामुळे अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिली नाही आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं हे अपयश आहे. तर अमरावतीमध्ये पोलिसांचा धाकच राहिला नाही. सत्तेतील आमदार पोलीस ठाण्यात खून खराबा करतात. त्यामुळे महाराष्ट्र यांना माफ करणार नाही”, असा हल्लाबोल यशोमती ठाकूर यांनी केला.