प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध प्रश्नांवर मनमोकळेपणाने उत्तरे दिली. विशेष म्हणजे त्यांनी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांच्यावर सडकून टीका केली. तसेच प्रहार पक्ष महायुतीत आहे का? या प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलं. “अमरावतीत आम्ही लढतोय. आता महायुतीत आम्हाला ठेवायचं का हा निर्णय महायुतीचा आहे. हा निर्णय माझा नाही. त्यांनी जो काही निर्णय घेतला त्याचं मी स्वागत करतो. आम्ही अमरावतीत बंड केलं आहे. महायुतीत ठेवायचं की नाही तो त्यांचा निर्णय आहे”, अशी भूमिका बच्चू कडू यांनी मांडली.
“माझा विरोध फक्त अमरावतीपुरता आहे. नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध करण्यामागे दोन-तीन गोष्टी आहे. मारण्याची भाषा करणे, जिल्ह्याचं पूर्ण वातावरण जाणीवपूर्वक वादाचं निर्माण करणे, क्षेय घेण्याचं काम करणं, घरात येऊन मारणार अशी मला धमकी देणं, याशिवाय कामच काही केलं नाही. गेल्या पाच वर्षात या जिल्ह्यात काहीच काम केलं नाही. त्यामुळे प्रहारने उभं राहिलं पाहिजे, अशी नागरिकांची मागणी होती. अमरावतीची निवडणूक आम्ही मुद्द्यावर लढत आहोत. धर्म जातीवर लढत नाहीत. शेतकऱ्यांच्या, बेरोजगारांच्या प्रश्नावर निवडणूक लढतो आहोत. आता माहिती पडेल लोकं मुद्द्यांवर आहेत, पक्षासोबत आहेत की जातीच्या मुद्द्यावर आहेत”, असं बच्चू कडू म्हणाले.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कोणताही संवाद झाला नाही. त्यांचा कोणताही फोन आला नाही. संपर्क झाला नाही”, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं. “रवी राणा यांना दाखवावं की कुठं तोडपाणी केली. यामुळेच आम्ही निवडणूक लढतोय. आम्ही तोडपाणी करणारे असू तर दाखवावं”, असं चॅलेंज रवी राणा यांनी दिलं आहे. “आता वेळ गेली आहे. आता ब्रह्म देव आला तरी काही परिणाम होणार नाहीत. आम्ही उमेदवारी मागे घेणार नाही”, अशी भूमिका बच्चू कडू यांनी मांडली.
“भाजप आणि देशाच्या लोकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वाचे असतील तर आमच्यासाठी आमचा शेतकरी बाप महत्त्वाचा आहे. आमचा शेतमजूर महत्त्वाचा आहे. बेरोजगाराचा प्रश्न महत्त्वाचा आहे. शिक्षण, आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. यासाठी कुणीच आवाज उठवायचा नाही का? आम्ही शेतकऱ्यांसाठी कुणावरही टीका करु शकतो. कुणासोबतही वाद घालू शकतो. शेतकरी, शेतमजूर, गरीब, वंचितांसाठी कुणासोबतही वाद घालू शकतो. कारण मूळ आमचा पायाच तो आहे. आम्ही सेवेतून राजकारणात आलो. झेंड्याचे रंग दाखवून आम्ही राजकारणात आलो नाही. तो आमचा बाणा आहे. आम्ही शेवटपर्यंत त्यासोबत राहू”, असं बच्चू कडू म्हणाले.
“मी एकनाथ शिंदे यांना भेटून आल्यानंतर ते म्हणाले की, आम्ही बोलतोय. पण बोलण्याच्याआधीच तिकीट जाहीर झाला. मी अर्ज भरण्याच्या आधी एकनाथ शिंदेंशी संवाद साधला होता. आता संवाद नाही. कुणाला मदत होण्याचा प्रश्नच नाही. आम्हीच निवडून येणार आहोत. सर्व उमेदवारांचे डिपॉझिट आम्ही जप्त करणार आहोत. एका कार्यकर्त्याला सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते पाठिंबा देतील”, असा दावा बच्चू कडू यांनी केला.