महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भाजपकडून खासदार नवनीत राणा यांना आज अखेर अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नवनीत राणा या भाजपच्या अधिकृत उमेदवार असणार आहेत. भाजपकडून आज देशातील विविध राज्यांचे उमेदवार जाहीर करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील एका जागेसाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आली. हा उमेदवार दुसरा तिसरा कुणी नसून नवनीत राणा आहेत. भाजपकडून याआधी 23 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने याआधी दोन टप्प्यात उमेदवार जाहीर केले होते. पहिल्या यादीत 20 उमेदवारांची नावे होती. तर दुसऱ्या यादीत तीन उमेदवारांची नावे होती. आता तिसऱ्या यादीत नवनीत राणा यांचं एकमेव नाव आहे.
भाजपकडून नवनीत राणा यांची अमरावती लोकसभा मतदारसंघातून पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली असली तरी त्यांच्यापुढे अडचणींचा फार मोठा डोंगर आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुरस्कृत उमेदवार मानल्या जात होत्या. त्यांना अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता. पण गेल्या पाच वर्षात सत्तेची समीकरणे बदलली. ज्या राणांनी भाजप विरोधात प्रचार केला तेच राणा आता भाजपचे पक्के मित्र बनले. त्यामुळे भाजपकडून यावेळी नवनीत राणा यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं आहे.
नवनीत राणा यांच्या उमेदवारीला आमदार बच्चू कडू आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्याकडून विरोध केला जात होता. नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपला नवनीत राणा यांना विरोध कायम असल्याचं स्पष्ट केलं आहे.
“आमचा विरोध कायम आहे. आम्ही कायम विरोध करु. आम्ही केल्या तक्रारीचा काही उपयोग झाला नाही. आम्ही आता बघू, एकंदरीत काय रणनीती आहे त्यापद्धतीने उमेदवार द्यायचा का, याबाबत निर्णय घेऊ. आम्ही नवनीत राणा यांचा शंभर टक्के प्रचार करणार नाहीत. नवनीत राणा यांच्यासाठी ही लढत तेवढी सोपी राहणार नाही. याचा रिझल्ट नक्कीच दिसेल. आम्ही नवनीत राणा यांना शंभर टक्के पाडणार”, असं बच्चू कडू यांनी म्हटलं. “आम्ही आता विरोधात प्रचार करुन त्यांना महायुतीत ठेवायचं किंवा न ठेवायचं हा त्याचा प्रश्न आहे”, असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला पहिली प्रतिक्रिया दिली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप खूप धन्यवाद. माझ्या अमरावतीच्या लोकांनी मला इथपर्यंत आणलं. त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. मी मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे खूप आभार मानते”, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली.