रवी राणा लोकसभेचा बदला विधानसभेला घेणार? अभिजीत अडसूळ यांचा मार्ग कठीण होणार?

| Updated on: Oct 23, 2024 | 4:15 PM

दर्यापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार अभिजीत अडसूळ आणि रवी राणा यांच्यातील संघर्षामुळे महायुतीत फूट पडण्याची शक्यता आहे. रवी राणा यांनी रमेश बुंदिले यांना उमेदवार म्हणून उभे करण्याची शक्यता वर्तवली आहे, तर अडसूळ यांनी विकासाची हमी दिली आहे. यामुळे दर्यापुरात निवडणुकीची लढत तीव्र होण्याची शक्यता आहे.

रवी राणा लोकसभेचा बदला विधानसभेला घेणार? अभिजीत अडसूळ यांचा मार्ग कठीण होणार?
रवी राणा लोकसभेचा बदला विधानसभेला घेणार? अभिजीत अडसूळ यांचा मार्ग कठीण होणार?
Follow us on

महायुतीत सारं काही आलबेल आहे, असं दाखवलं जात असलं तरी खरंच तसं आहे का? हा खरा प्रश्न आहे. लोकसभेत भाजपकडून अमरावती मतजदारसंघात माजी खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी शिवसेना नेते आनंदराव अडसूळ आणि त्यांचे चिरंजीव अभिजीत अडसूळ यांनी राणा यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. आता विधानसभा निवडणुकीत अभिजीत अडसूळ यांना शिवसेनेकडून दर्यापूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. यानंतर लगेच आमदार रवी राणा यांनी अभिजीत अडसूळ यांच्याविरोधात रणनीती आखायला सुरुवात केली असल्याची चर्चा आहे. कारण रवी राणा या मतदारसंघात निवडणुकीत वेगळा गेम खेळण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे दर्यापुरात महायुतीच्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता आहे.

अमरावतीच्या दर्यापूर मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेकडून अभिजित अडसूळ यांना उमेदवारी जाहीर होताच भाजपचे माजी आमदार रमेश बुंदीले आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. विशेष म्हणजे महायुतीत असतानाही आमदार रवी राणा हे रमेश बुंदिले यांना अभिजित अडसूळ यांच्या विरोधात उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे अडसूळ विरुद्ध राणा वाद पुन्हा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

रवी राणा काय म्हणाले?

“बाहेरचा कांदिवलीचा पार्सल दर्यापूरात पाठवणं जनतेला पटणार नाही. ती जागा भाजपची होती. भाजपचे, युवा स्वाभिमानीचे कार्यकर्ते विरोधात आहेत. बाहेरचा कांदिवलीचा पार्सल दर्यापूरात पाठवणं जनतेला पटणार नाही. मतदारसंघ बेवारस होऊ देणार नाही”, असं रवी राणा म्हणाले. यावेळी रवी राणा यांना बंडाबाबत विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी “लोकांना आपलासा आवडणारा उमेदवार भेटणार”, अशी प्रतिक्रिया दिली.

“रमेश बुंदीले यांना अजून उमेदवारी देण्याचा निर्णय झालेला नाही. त्यांचा पक्षप्रवेश होत आहे. त्याबाबत सगळ्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय होईल. अडसूळांचा प्रचार करणं योग्य नाही. त्यांनी आमदारकी भोगली. ते 2-2 वर्षे मतदारसंघात पाऊल ठेवत नाहीत. लोकांच्या न्यायासाठी लढलं पाहिजे. असा उमेदवार दर्यापूरात पाहिजे”, असं सूचक वक्तव्य रवी राणा यांनी केलं.

अभिजीत अडसूळ काय म्हणाले?

“माझं काम पाहून पक्षाने मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद”, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे उमेदवार अभिजीत अडसूळ यांनी दिली. त्यांना माजी खासदार नवनीत राणा यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी महायुती असो किंवा महाविकास आघाडी अनेक ठिकाणी इच्छुक आहेत. “बेरोजगार तरुणांसाठी रोजगार आणणार आहे”, असा निर्धार अभिजीत अडसूळ यांनी व्यक्त केला.