अमरावती : भाजपा नेते व माजी कृषिमंत्री (Former Minister of Agriculture) डॉ. अनिल बोंडे (Dr. Anil Bonde) यांनी शरद पवार यांच्यावर बोचरी टीका काल केली. यावर बोलताना मोर्शी वरूड मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार (MLA Devendra Bhuyar) यांनी सांगितले की, डॉ. बोंडे हे 3-4 वाजता नंतर शुध्दीवर नसतात. त्यामुळे ते 3-4 वाजतानंतर काय बोलले हे फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नाही. आता त्याचे वय 62 वर्षे झाले. माणसाला चाळीशीनंतर अक्कल दाढ येते. परंतु या माणसाला अजून अक्कलदाढ आली नाही. ते हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण होणारे वक्तव्य करत असतात. त्यामुळे भविष्यात एखादी दंगल घडू नये यासाठी बंदोबस्त करणे गरजेचे असल्याचे आमदार देवेंद्र यानी सांगितले.
देवेंद्र भुयार हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्यातील एकमेव आमदार आहेत. मात्र नुकताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यामुळे देवेंद्र भुयार हे उद्या शरद पवार यांच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र तूर्तास आपण प्रवेश करणार नाही. विदर्भातील सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून नंतरच निर्णय घेऊ, अशी सावध प्रतिक्रिया देवेंद्र पवार यांनी दिली.
अनिल बोंडे हे एमडी मेडिसिन आहेत. हार्ट, बिपी, लिव्हर, शुगर याबद्दल विचारलं पाहिजे. हे न विचारता घर से बाहर निकलो. काट डालेंगे, छाट डालेंगे, हे बोलणं त्यांना शोभत नाहीत. हे पराभूत झाले तेव्हापासूनचे यांचे भाषण तपासा. धरण, पुनर्वसनावर बोलत नाहीत. मात्र, हे हिजाबवर बोलत असतात. डिग्री कोणती, कोणत्या विषयावर बोलतात. याचा विचार आमच्या मामांनी म्हणजे डॉक्टर बोंडे यांनी केला पाहिजे. हे मामा आता साधे मामा राहिले नाही. शकुनी मामा झाले आहेत. आता हिंदू, मुस्लीम, दलित असं आग लावण्याचं काम ते करत आहेत. अशी टीकाही देवेंद्र भुयार यांनी केली.