Bachchu Kadu | ‘राणा दाम्पत्याला देवेंद्र फडणवीस यांचं अभय’, बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य, चौकशीची मागणी

| Updated on: Sep 15, 2023 | 3:34 PM

यशोमती ठाकूर यांनी निवडणुकीच्या वेळी रवी राणांकडून कडक नोटा घेतल्या, असा दावा नवनीत राणा यांनी केलाय. त्यांच्या याच वक्तव्यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिलीय. नवनीत राणा यांनी केलेल्या वक्तव्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केलीय.

Bachchu Kadu | राणा दाम्पत्याला देवेंद्र फडणवीस यांचं अभय, बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य, चौकशीची मागणी
Follow us on

अमरावती | 15 सप्टेंबर 2023 : आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभय असल्यामुळे ते काहीही वक्तव्य करतात, असं अचलपूरचे आमदार बच्चू कडू म्हणाले आहेत. नवनीत राणा यांनी नुकतंच काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधला होता. नवनीत राणा यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात यशोमती ठाकूर यांच्यावर 2019 च्या निवडणुकीत रवी राणा यांच्याकडून कडक नोटा घेतल्याचा आरोप केलाय. त्यांच्या याच वक्तव्याची बच्चू कडू पोलिसात तक्रार करणार आहेत. त्यांनी नवनीत राणा यांच्या वक्तव्याच्या आधारावर सखोल चौकशीची मागणी केलीय.

“देवेंद्र फडणवीस यांचं अभय असल्यानेच राणा दाम्पत्य काहीही वक्तव्य करतात”, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. “फडणवीसांनी राणांना आवर घातला पाहिजे”, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत. “पैसे वाटले, असं नवनीत राणांनी खुलेपणाने सांगितलंय. त्यामुळे चौकशी झाली पाहिजे”, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली.

नेमकं प्रकरण काय?

राणा दाम्पत्याने गेल्या वर्षी दहीहंडीच्या कार्यक्रमात बच्चू कडू यांच्यावर आरोप केला होता. आता याच दहीहंडीच्या कार्यक्रमातून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर टीका केलीय. यशोमती ठाकूर यांनी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी कडक नोटा घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. पण निवडणुकीच्या वेळी मतांसाठी पैसे वाटणं हा गुन्हा आहे. त्यामुळे याप्रकरणी चौकशी व्हावी, अशी बच्चू कडू यांची मागणी आहे.

नवनीत राणा यशोमती ठाकूर यांच्याबद्दल काय म्हणाल्या?

“2019 च्या लोकसभेत ताईंनी आमदार रवी राणा यांच्याकडून कडक नोटा घेतल्या आणि प्रचार दुसऱ्याचा केला. सगळी मतं ही विरोधकांना दिली. तुम्ही काय इमानदारीची भाषा करताय?”, अशी टीका नवनीत राणा यांनी केली होती. त्यांच्या या टीकेवर यशोमती ठाकूर यांनी देखील प्रतिक्रिया दिलीय. त्यानंतर आता बच्चू कडू यांनी चौकशीची मागणी केलीय.

बच्चू कडू काय म्हणाले?

“यशोमती ठाकूर यांच्यावर ते थेट पैसे दिल्याचा आरोप करत आहेत. त्यामुळे त्यांनी किती पैसे दिले आणि यशोमती ताईंना किती पैसे मिळाले याची चर्चा सुरु झालीय. 2019 ला पैसे घेतले म्हणता आणि तुम्ही आता विषय काढता, पैसे देणाराही चुकीचा आहे. सर्वात अगोदर पैसे देणारा चुकीचा आहे. त्या संदर्भात आम्ही पोलिसात तक्रार करणार आहोत”, असं बच्चू कडू म्हणाले.

“नवनीत राणा यांनी खुलेआम असं वक्तव्य केलेलं आहे. त्यांच्या वक्तव्याची चौकशी झाली पाहिजे. रवी राणा यांनी खरोखरंच किती पैसे दिले, किंवा यशोमती ताईंनी किती पैसे घेतले हे पाहणं गरजेचं आहे”, असंही बच्चू कडू म्हणाले.

“त्यांना देवेंद्र फडणवीस यांचं अभय आहे. ते नेहमी अभय देत असतात त्यामुळे ते उठसूठ काहीही बोलत असतात. मला वाटतं देवेंद्र फडणवीस यांना आमची विनंती आहे की, यांना आवर घालावं लागेल. अशा पद्धतीने भाजप पक्षाची बदनामी होतेय”, असा दावा बच्चू कडू यांनी केला.

रवी राणा यांची बच्चू कडूंवर टीका

रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर नुकतंच टीका करताना गुवाहाटीचा विषय काढला होता. त्यांनी गुवाहाटीच्या मुद्द्यावरुन याआधीदेखील टीका केली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा या मुद्द्यावरुन टीका केली. “मी काही गुवाहाटीला जाणारा आमदार नाही. ना बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपय्या, हे या मतदारसंघाच्या आमदाराचं स्लोगन आहे. काय आहे स्लोगन… ना बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपया, रुपये आणायला गुवाहाटीला जायला लागते ना”, अशी टीका रवी राणा यांनी केली.

राणा दाम्पत्याकडून यशोमती ठाकूर, बच्चू कडू यांच्या व्यतिरिक्त ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने सडकून टीका केली जाते. राणा दाम्पत्याकडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांच्यावर टोकाची टीका करण्यात आलीय. विशेष म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असताना राणा दाम्पत्य आणि ठाकरे यांच्यातील संघर्ष प्रकर्षाने बघायला मिळाला होता. या संघर्षामुळे राणा दाम्पत्याला काही दिवस जेलमध्ये जावं लागलं होतं.