खासदार नवनीत राणा यांना भाजपकडून अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर आता नवनीत राणा या आपल्या युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहेत. खासदार नवनीत राणा या युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांच्याकडे आपला राजीनामा सोपवणार आहेत. त्यांच्या राजीनामाची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच नवनीत राणा यांना आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष लोकसभा निवडणुकीत पाठिंबा देणार आहेत. विशेष म्हणजे भाजपची उमेदवारी घोषित होताच नवनीत राणा नागपूरसाठी रवाना झाल्या आहेत. त्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.
“नवनीत राणा यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया दिलीय. मी म्हटलं होतं लक्ष्मीच्या हाती कमळ असते ते मला मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे मी मनापासून आभार मानते. अमरावतीकरांचा आवाज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐकला. मी मेहनत करणारी आहे. त्यामुळे मला हे फळ मिळालं. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मी जात आहे. तिथून भाजप प्रवेशाची प्रक्रिया सुरु होईल”, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली.
“अमरावती विकासासाठी मी काम करणार. आज नागपूरला जातो आहे. या ठिकाणी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार तर उद्या मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार. उद्या दुपारी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार. मी 13 वर्षांपासून अमरावतीकरांची सेवा केली त्यामुळे मला कमळ मिळालं. महायुतीच्या सर्व घटक पक्षाच्या नेत्यांना नम्र विनंती की मी अमरावतीची सून आहे. त्यामुळे माझ्या डोक्यावर आशीर्वाद द्या”, असं नवनीत राणा म्हणाल्या.
आमदार रवी राणा यांनीदेखील प्रतिक्रिया दिलीय. “भाजपने नवनीत राणांवर विश्वास दाखवला. देशाच्या पंतप्रधानांचे व्हिजन भाजपच्या कार्यकर्त्या म्हणून पुढे नेण्याचे काम नवनीत राणा करतील. नवनीत राणा यांच्या उमेदवारीला कुठल्याही भाजपच्या कार्यकर्त्यांचा विरोध नाही. घटक पक्षांना, बच्चू कडूंना हात जोडून विनंती करतो की, जिल्ह्याच्या विकासासाठी, महाराष्ट्रासाठी मोदीजींचे हात मजबूत करा आणि नवनीत राणांना विजयी करा. बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्या पक्षप्रवेश करतील”, अशी प्रतिक्रिया