अमरावती : आज राज्यभर अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar Jayanti) यांची जयंती राज्यभर थाटामाटात साजरी झाली. मात्र चौंडीत जो प्रकार घडला त्यावरून अजूनही जोरदार टीका होत आहे. भाजप आणि इतर विरोधक यावरून आता सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप आमदार आणि धनगर नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना चौडीत जाताना पोलिसांनी अडवलं. त्यांच्याबरोबर सदाभाऊ खोतही होते. या दोघांना पोलिसांनी अडवल्यानंतर दोघांनीही सरकारवर टीकेची झोड उडवली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर राष्ट्रवादीने जयंतीचा कार्यक्रम हा हायजॅक केला म्हणत रोहित पवार यांच्यावर हल्लाबोल चढवला. हे सरकार सत्तेचा आणि पोलिसांचा गैरवापर करत आहे. अशी टीका वारंवर होत आहे. आता आज घडलेल्या राजकीय ड्राम्यावरून आता नवनीत राणा (Navneet Rana) यांनी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल चढवला आहे.
जे राजकीय वेगवेगळ्या दृष्टीचे लोक आहे त्यांनी आपली पावर ठेवली पाहिजे मात्र कोणी आपल्या पावरचा दुरुपयोग करू नये, गेल्या अडीच वर्षांपासून हेच सुरू आहे. अशा कार्यक्रमात जाण्यापासून कोणाला अडवणे हे काही चांगलं नाही आणि महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. आज पावर इथे आहेत, उद्या सत्तेच्या बाहेरही जाणार आहेत. त्याचा विचार करून पाऊलं टाकली पाहिजेत, असा इशाराही नवनीत राणा यांनी दिला आहे.
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीला गेलेल्या गोपीचंद पडळकरांना रोखणं चुकीचं आहे, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेसने हायजॅक करण्याचा प्रयत्न केलाय, तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्यामार्गावर चालणाऱ्या पडळकर याना अडवलं हे निंदनीय आहे, अशा तीव्र शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आणि रोहित पवारांवर हल्लाबोल चढवला आहे. त्यामुळे हा वाद आता दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
तर या प्रकाराबाबत आमदार रोहित पवार यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. या गोष्टीचं कोणी राजकारन करू नये. हा कार्यक्रम देशातील सर्व जनतेचा आहे. त्यामुळे आज मला राजकीय काही बोलायचे नाही. हा कार्यक्रम झाल्यावर माझ्यावर आरोप करणाऱ्यांना उत्तर देईल. आम्ही सगळ्यांना एकत्रित घेऊन काम करत आहोत. तुम्ही पाहू शकता लोक मोठ्या प्रमाणात येत आहेत, असे म्हणत राम शिंदेच्या आरोपांना आणि गोपीचंद पडळकरांच्या आरोपांना रोहित पवार यांनी प्रत्यूत्तर दिलं आहे.