अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसीमधील गोल्डन फायबर कंपनीत काम करणाऱ्या महिला कामगाराला शरीर सुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कंपनीमधील अधिकारी जवानसिंह रावत या अधिकाऱ्याने शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या प्रकरणी महिला कामगार आक्रमक झाल्या आहेत. संतप्त कामगार महिला आणि मनसे पदाधिकारी पोलीस आयुक्त कार्यालयावर धडकल्या. तीन दिवसांपूर्वी याच कंपनीमध्ये 100 पेक्षा अधिक महिलांना विषबाधा झाली होती.
शरीर सुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यावर निलंबन करून गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेने केली. विशेष म्हणजे अधिकाऱ्याची तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या महिलेची तक्रार पोलिसांनी फाडल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही, असा गंभीर आरोप पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणी पोलिसांवरही गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच ज्या अधिकाऱ्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे त्याच्यावर कंपनीच्या वरिष्ठांकडून काही कारवाई केली जाते का? ते पाहणं महत्त्वाचं आहे. तसेच पोलीस काय कारवाई करतात, गृह विभाग या घटनेची गंभीरतेने दखल घेतं का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
राज्यात महिला किती सुरक्षित आहेत? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय. दरम्यान, अमरावतीत ज्या कंपनीत संबंधित प्रकार घडला आहे त्याच कंपनीत दोन दिवसांपूर्वी 100 पेक्षा जास्त महिलांना विषबाधा झाली होती. या महिलांची प्रकृती बिघडल्यानंतरही त्यांना कंपनीने रुग्णालयात दाखल केलं नव्हतं. शेवटी स्थानिक मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना कंपनीत नेत सोक्षमोक्ष लावण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी कंपनीत जावून पाहणी केली असता अनेक महिला कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यानंतर सर्व बाधित महिलांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. यानंतर आता याच कंपनीत एका अधिकाऱ्याकडून महिलेला शरीर सुखाची मागणी करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या कंपनीत जवळपास 700 महिला काम करतात. त्यामुळे संबंधित प्रकरण अतिशय गंभीर आहे. या प्रकरणी आता काय कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं आहे.