स्वप्निल उमप
अमरावती : आयुष्यात महत्वाच्या टप्प्यात काही वर्षांपूर्वी शेतकरी बापाच दुर्दैवी निधन झालं. कुटुंबाची जबाबदारी जन्मदात्या आईवर आली. पण शेतकऱ्याची लेक धनश्री खचून गेली नाही. तिला तिच्या आई-वडिलांच स्वप्न पूर्ण करायचं होतं. त्यासाठी तिनं जिद्द आणि चिकाटी कायम ठेवली. 2019 मध्ये तिने राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा (Sub-Inspector of Police Examination) दिली. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील अचलपूरच्या धनोडा (Dhanoda of Achalpur) या खेड्या गावातील धनश्री भाऊराव सगणे ही पोलीस उपनिरीक्षकाची परीक्षा पाहिल्याच टप्प्यात पास झाली. पण पुढे आव्हान होत शारीरिक चाचणी पास होण्याचं. त्यासाठी धनश्री भाऊराव सगणे (Dhanashree Bhaurao Sagane) या विद्यार्थ्यांनी अफाट मेहनत घेतली. नुकत्याच पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या घेण्यात आलेल्या शारीरिक चाचणीत विदर्भातून पहिली येण्याचा तिने मान मिळवला आहे.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील धनोडा या गावात धनश्री सगणे ही विद्यार्थिनी रहाते. 2018 पासून तिने पोलीस उपनिरीक्षक पदासाठी या परीक्षेसाठी तिने तयारी सुरू केली. 2019 मध्ये तिने परीक्षा दिली. पहिल्याच टप्प्यात ती उत्तीर्ण झाली. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी तिने शारीरिक चाचणी दिली. यामध्ये ती विदर्भातून पहिली आली आहे. मेहनत, चिकाटी आणि जिद्द हेच यशाचे गमक असल्याचं धनश्री सगणे यांनी सांगितलं.
गावात राहणारी मुलगी ही झेप घेईल, असं वाटत नव्हतं. पण, तिने चिकाटी सोडली नाही. मेहनत घेतली. वडील गेल्याचं दुःख होतं. पण, दुःखी राहण्यापेक्षा तिने मेहनतीवर भर दिला. त्यामुळं ती आता इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. धनश्रीने सरावाला सुरुवात केली तेव्हा पहिल्या दिवशी लोखंडी गोळा फेकल्या जात नव्हता. आता ती सहा-सात मीटरपर्यंत गोळा फेकते. आईला फोन केला. तेव्हा आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले होते. धनश्रीचा अभ्यास सुरूच आहे. पुढं तिला डीवायएसपी बनायचं आहे. ग्रामीण भागातील तरुणांनी खचून जाऊ नये, असं धनश्रीचं म्हणणं आहे.