अमरावतीत राजकीय वातावरण तापलं, पोलीस आणि बच्चू कडू यांच्यात प्रचंड बाचाबाची, नेमकं काय घडतंय?

| Updated on: Apr 23, 2024 | 5:01 PM

महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमित शाह यांची उद्या सायन्स कोर मैदानावर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव 23 आणि 24 एप्रिलला प्रहार पक्षाला असलेली परवानगी रद्द करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शाह येणार असतील तर 24 तासांआधी सर्व सुरक्षा यंत्रणा कामाला लागते, अशी भूमिका पोलिसांची आहे. पण यामुळे बच्चू कडू प्रचंड आक्रमक झाले आहेत.

अमरावतीत राजकीय वातावरण तापलं, पोलीस आणि बच्चू कडू यांच्यात प्रचंड बाचाबाची, नेमकं काय घडतंय?
पोलीस आणि बच्चू कडू यांच्यात बाचाबाची
Follow us on

अमरावतीत वातावरण तापलं आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू प्रचंड आक्रमक झाले आहेत. प्रहारकडून सायन्स कोर मैदान हे 23 आणि 24 एप्रिलसाठी आरक्षित करण्यात आलं होतं. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उद्या सायन्स कोर मैदानावर सभा होणार आहे. महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमित शाह यांची उद्या सायन्स कोर मैदानावर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव 23 आणि 24 एप्रिलला प्रहार पक्षाला असलेली परवानगी रद्द करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शाह येणार असतील तर 24 तासांआधी सर्व सुरक्षा यंत्रणा कामाला लागते, अशी भूमिका पोलिसांची आहे. पण यामुळे बच्चू कडू प्रचंड आक्रमक झाले आहेत. बच्चू कडू यांनी सायन्स कोर मैदानावर ठिय्या मांडला आहे. अमित शाह यांच्या सभेला परवानगीची गरज नाही. सुरक्षेचं कारण सांगून तुम्ही आमच्या सभेला परवानगी कशी नाकारता? असा प्रश्न बच्चू कडू यांना उपस्थित केला. यावेळी बच्चू कडू यांनी पोलिसांना भाजपचा दुपट्टा गळ्यात घालण्याचा सल्ला दिला. यावेळी पोलीस आणि बच्चू कडू यांच्यात बाचाबाची झाली.

“आम्ही 5 एप्रिलला अर्ज केला होता. त्यानंतर 7 आणि 12 तारखेला अर्ज केला होता. नंतर 18 एप्रिलला आम्हाला या जागेची परवानगी मिळाली. आमच्याकडे प्रशासनाच्या परवानगीची कागदपत्रे आहेत. आम्हाला 23 आणि 24 एप्रिलला सभा घेण्यासाठी परवानगी मिळाली होती. तर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना 21 आणि 22 तारखेसाठी परवानगी मिळाली होती. आम्हाला परवानगी असूनही इथे येण्यासाठी पोलिसांकडून मज्जाव केला जातोय”, अशी भूमिका बच्चू कडू यांनी मांडली.

‘आमच्याकडे पुरावे’, बच्चू कडू यांचा दावा

“याउलट राणांना परवानगी नाही. पण त्यांच्या सभेसाठी आम्हाला मज्जाव केला जातोय. अमित शाह यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तुमची परवानगी नाकारली जात आहे, असं पोलीस म्हणत आहेत. पण आम्हाला प्रशासनाने आधीच परवानगी दिली आहे. आमच्याकडे पुरावे आहेत”, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना दिली.

‘गृहमंत्री येऊनच कायदा आणि आचारसंहिता भंग होत असेल तर…’

“आम्ही परवानगी मिळाल्यानंतर सर्व पैसे भरले. आम्ही 23 आणि 24 तारखेचे पैसे भरले आहेत. आम्ही सर्व कार्यकर्त्यांना सांगिलतं की, उद्या आमची सभा आहे. पण पोलिसांनी सांगितलं की, तुमची परवानगी बिरवानगी गेली चुल्ह्यात. उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार आहेत. गृहमंत्री येऊनच कायदा आणि आचारसंहिता भंग होत असेल तर मला वाटतं काहीच शिल्लक राहिलेलं नाही”, असं बच्चू कडू म्हणाले.