अमरावती : सद्या महाराष्ट्र राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. खरतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी या संदर्भात चर्चा केली असती तर घडलेला प्रसंग टाळता आला असता. मात्र शिवसैनिक रस्त्यावर उतरवून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला जातोय. याला गुंडशाही म्हणतात. आणि याच अस्थिरतेमुळे राज्यात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी शिवसेनेची (Shiv Sena) ही शेवटची फडफड सुरू आहे. राज्यातील नागरिक बघताहेत. येत्या काळात शिवसेनेची जागा त्यांना दिसेल असं सूचक वक्तव्य भाजपचे माजी कृषिमंत्री (Former Minister) डॉ. अनिल बोंडे यांनी अमरावतीत केलं आहे.
माजी मंत्री अनिल बोंडे म्हणाले, शिशुपालाप्रमाणे शिवसेनेचे शंभर अपराध भरायला आले आहेत. शिवसेनेने शेवटची फडफड केली आहे. जेवढी काही ताकद लावायची त्यानी ते मुंबईत लावली आहे. ती कुणासाठी तर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यासाठी. खासदार महिलेला शिवसेनेनं काय काय शिव्या दिल्या. अख्या महाराष्ट्रानं ऐकल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थोडी समज दाखवायली हवी होती. त्यांच्याशी बोलले असते, तर हा प्रसंग टाळता आला असता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पोलिसांवर विश्वास नाही. पोलिसांना त्यांनी रोखलं असतं. स्वताच्या घराची सुरक्षा केली असती. पण, संपूर्ण महाराष्ट्रात गोंधळ उडवायचा. तो महाराष्ट्राला शोभणारा नाही. आवडणारा नाही. त्याशिवाय आता आणखी गुंडागर्दी सुरू झाली.
किरीट सोमय्यांवर दगडफेक करण्यात आली. त्यात ते जखमी झाले. मोहित कंबोज यांची गाडी फोडण्यात आली. पोलिसांना बटीक करून ठेवलंय. ज्यांच्यावर दगडफेक झाली त्यांची तक्रार घेतली जात नाही. उलट त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. त्यामुळं ही आणीबाणीसारखी परिस्थिती लावली जात आहे, असा आरोप अनिल बोंडे यांनी अमरावतीत केला. हे सारं लोकं पाहत आहेत. संजय राऊत यांचे वेडे चाळे पाहत आहेत. त्यामुळं लोकं हे विसरणार नाही. यांची ही शेवटची फडफड आहे. उत्तर प्रदेशात मुलायम सिंह यांचा मुलगा अखिलेश यादव यांनी यावेळी याचं कारणामुळं नाकारण्यात आलंय. कारण यादवांची गुंडगिरी वाढली होती. लोकांना ती यादवांची गुंडगिरी आठवत होती. आता या शिवसैनिकांची गुंडगिरी लोकं सपशेल नाकारणार आहेत. हे लक्षात ठेवणार आहे. म्हणून शिवसेनेची ही शेवटची फडफड आहे.