नागपूर :विदर्भात गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाची बॅटिंग सुरू आहे. नदी, नाले, तलाव आधीच भरलेत. अशात आणखी पावसानं गेल्या पाच दिवसांपासून ठाण मांडलं. त्यामुळं नदी, नाले दुथळी भरून वाहत आहेत. या पावसामुळं शेतात पाणी जास्त झालं. त्यामुळं पिकं सडून शेतकऱ्यांचं नुकसान (Crop Damage) होत आहे. भंडारा येथील नाल्यात एक ५६ वर्षीय व्यक्ती पुरात वाहून (Washed Away) गेला. नाल्याला आलेल्या पुरात वाहून 56 वर्षीय शेतकऱ्याच्या मृत्यू झाला. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील टांगा येथे घडली. जगदीश नारायण गिरिपुंजे (Jagdish Giripunje) असं वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मोहाडी तालुक्यात 12 व 13 सप्टेंबर अतिवृष्टी झाली. नदी नाल्याला पूर आला. शेतकरी जगदीश गिरिपुंजे यांच्याकडे दोन एकर शेती आहे. ती शेती नाल्यापलीकडे आहे. नाल्याच्या पुरातून जात असताना अचानक पाण्याच्या प्रवाहात ते वाहून गेले. शेतकरी पुरात वाहून गेल्याचे लक्षात येताच याची आंधळगाव पोलिसांना माहिती दिली. शोध मोहीम राबविल्यावर अखेर जगदीश यांचा मृतदेह सापडला.
अमरावतीत गेल्या 5 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. आज अमरावती शहरासह ग्रामीण भागात तुफान पावसाची बॅटिंग सुरू आहे. या पावसामुळे नागरिकांची पार दाणादाण उडाली आहे. पुढील तीन दिवस असाच पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवली आहे.
सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. धामणगाव रेल्वे , चांदुर रेल्वे गावात घर कोसळले.
गडचिरोली जिल्ह्यातील प्राणहिता, वैनगंगा, इंद्रावती, इराई या चारही नद्यांचा पूर ओसरला. जिल्ह्यातील अनेक मुख्य मार्ग सुरळीत झालेले आहेत. आष्टी गोंडपिंपरी – चंद्रपूर हा मार्ग सुरळीत झाला. आलापल्ली – भामरागड छत्तीसगड हा राष्ट्रीय महामार्ग आणि सुरळीत झालेला आहे.
चामोर्शी -गडचिरोली हा राष्ट्रीय महामार्ग पूर ओसल्याने सुरळीत झालेला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वाहतूक तीन दिवसानंतर आज सकाळपासून सुरळीत झाली. सध्या गडचिरोली जिल्ह्यातील एक राष्ट्रीय महामार्ग बिनागुंडा ते लाहेरी हा पुरामुळे बंद आहे. गडचिरोली जिल्ह्यात चौथ्यांदा पुराचा फटका बसला.