महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. कारण आगामी काळात विधानसभेची निवडणूक असणार आहे. त्याआधीच सीबीआयकडून अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करुन आरोपी बनवण्यात आलं आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर मोक्का अंतर्गत खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी अनिल देशमुखांनी गृहमंत्री असताना जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप आहे. खुद्द प्रवीण मुंढे यांनी सीबीआयकडे तसा जबाब नोंदवला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहे. संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल होताच अनिल देशमुख यांनी सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून ट्विट करत निशाणा साधला आहे.
“धन्यवाद… देवेंद्रजी फडणवीस! माझ्यावर सीबीआयकडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे. जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले आहेत. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता – न डगमगता मी भाजपच्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूनगाठ बांधली आहे”, अशा शब्दांत अनिल देशमुखांनी भूमिका मांडली.
“महाराष्ट्रात फडणवीसांकडून किती खालच्या पातळीचे आणि विकृत मानसिकतेचे घाणेरडे राजकारण सुरू आहे ते जनतेने बघावे. लोकसभा निवडणुकीत या कारस्थानी नेतृत्वाला जनतेने जागा दाखवून दिली आहे, आता महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाट बघत आहे”, असं अनिल देशमुख आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.
धन्यवाद…
देवेंद्रजी फडणवीसमाझ्यावर #CBI कडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे. जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले आहे. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता – न डगमगता मी #BJP च्या या दडपशाही…
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) September 4, 2024
या प्रकरणाचा पहिली बॉम्ब देवेंद्र फडणवीस यांनी टाकला होता. देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशना दरम्यान विधानसभेच्या सभागृहात एक पेनड्राईव्ह सादर केलं होतं. या पेनड्राईव्हमध्ये विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्याबाबतचं स्टिंग ऑपरेशन कैद करण्यात आलं होतं. फडणवीसांनी ते स्टिंग ऑपरेशन दाखवत महाराष्ट्राच्या राजकारणात नवा बॉम्ब टाकला होता. या माध्यमातून भाजप नेते गिरीश महाजन यांना अडकवण्याचा डाव होता, असा आरोप करण्यात आला होता. संबंधित प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आला होता. सीबीआयने या प्रकरणी अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.