Anjali Damania and Beed Police: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. वीस पेक्षा जास्त दिवस होऊनही या प्रकरणातील सर्व आरोपी पोलिसांना सापडले नाही. या प्रकरणात चार आरोपींना अटक केली आहे. तसेच इतर आरोपी फरार आहेत. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला होता. बीड हत्या प्रकरणातील तीन आरोपींची हत्या झाल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला होता. परंतु हा दावा चुकीचा असल्याचे बीड पोलिसांनी म्हटले आहे. तसेच आरोपीचा शोध कार्यास अडथळा येईल किंवा जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल, अशा प्रकारची माहिती किंवा कॉमेंट करू नये, अशा देखील सूचना पोलिसांनी केल्या आहेत.
बीड पोलिसांनी अंजली दमानिया यांच्या दाव्यानंतर पत्रक काढले आहे. त्यात म्हटले की, फरार आरोपींच्या मृत्यू संदर्भात सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केलेला दावा चुकीचा आहे. एका व्हॉइस मेसेजचा हवाला देत अंजली दमानिया यांनी फरार आरोपींचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. मात्र बसव कल्याण येथे असा कोणताही प्रकार घडल्या नसल्याची बीड पोलिसांनी म्हटले आहे.
अंजली दमानिया यांना ज्या व्यक्तीने तो व्हाईस मेसेज पाठवला तो दारूच्या नशेत होता. त्या नशेत त्याने तो मेसेज पाठवल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोणत्याही माहिती असल्यास प्रथम पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच आरोपीचा शोध कार्यास अडथळा किंवा जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल, अशा प्रकारची माहिती किंवा कॉमेंट करू नये, अशा देखील सूचना पोलिसांनी केल्या आहेत. बीड पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत हे पत्रक काढले आहे.
दरम्यान, बीड पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंजली दमानिया यांना पत्र दिले आहे. या पत्रातून दमानिया यांच्याकडून यासंदर्भात पुरावे मागितले आहे. दरम्यान, अंजली दमानिया यांनी त्यावर बोलताना सांगितले, मी यापूर्वी पोलीस अधीक्षकांना या प्रकरणाचे पुरावे दिले आहे. कदाचित गुन्हे शाखेपर्यंत ते गेले नसतील.