Anjali Damania Chhagan Bhujbal: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे भुजबळ जाहीरपणे नाराजी व्यक्त करत आहेत. परंतु त्यांच्या नाराजीची दखल पक्षाचे नेते अजित पवार यांनी घेतली नाही. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला आहे. भाजपमध्ये ओबीसी नेता हवा म्हणून, हे सर्व नाटक रंगवले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अंजली दमानिया यांनी सांगितले की, आमदार रुसला आणि त्यांची समजूत काढायची गरज नाही, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले. त्यामुळे आता कुठेतरी शंकेची पाल चुकचुकली आहे. हे सगळे एक गेम प्लॅन तर नाही ना? मी फेब्रुवारी महिन्यातच म्हटले होते की छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर आहेत. तेव्हा भुजबळ म्हणाले होते, असे काहीच नाही. माझा असा काही विचार नाही. त्यामुळे आता ‘नक्की दाल में कुछ काला है’, असे वाटत आहे.
अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला आहे. त्या म्हणाल्या, ओबीसी नेता भाजपमध्ये हवा म्हणून कदाचित हे छान नाटक रंगवले गेले आहे. त्यांना मंत्रीपद द्यायचे आहे. आता भुजबळ म्हणतील, कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की त्यांनी भाजपमध्ये जावे, असे दाखवले जाईल. त्यानंतर त्यांना देवेंद्र फडणवीस आपला पक्षात घेतील. सगळे त्यांचे कुठेतरी एक छान रंगवलेला नाटक आहे, असेच मला वाटते.
बीडच्या घटनेवर बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, वाल्मीक कराड यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. मला काही लोकांकडून आणि काही पत्रकारांकडून काही व्हिडिओज मिळाले. त्यात वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते असल्याचे स्पष्ट होते. तसेच त्यांच्या हातात पिस्तूल होता. पंकजा मुंडे या सगळ्या घटनेबद्दल काहीच का बोलत नाही, याबद्दल आपणास आश्चर्य वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बीडची एवढी मोठी घटना झाली आणि बीडच्या मंत्र्यांनी त्याच्याबद्दल काही चकार शब्द काढू नये? आज पंकजा मुंडे कुठच्या बाजूने आहेत. त्या वाल्मीक कराड याच्या बाजूने आहेत की त्यांच्याविरुद्ध आहेत हे त्यांनी जाहीर करावे.