बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात चर्चेत आलेला वाल्मिक कराड याच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी घणाघाती हल्ला केला आहे. वाल्मिक कराड याने कमवलेल्या संपत्तीचे विवरण देत कधीकाळी घरगडी असलेल्या व्यक्तीकडे अफाट संपती कशी आली? यासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशी करण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केली.
अंजली दमानिया म्हणाल्या, वाल्मिक कराड याच्याकडे इतका अफाट पैसा कुठून आला? काही दिवसांपूर्वी आपण त्याने एक वाईन शॉप आणि त्याची दुकान आणि जमीन ही एक कोटी 69 लाखाला विकत घेतल्याची माहिती दिली होती. तसेच मंजिरी कराड यांच्या नावावर ज्या गाड्या आहेत त्या देखील ट्विट केले होत्या. त्यांच्या मुलाकडे असलेल्या मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये डिफेंडर, वोल्वो असो बीएमडब्ल्यू असो इतक्या महागड्या गाड्या कशा आल्या? त्यांचा काय उद्योग आहे? वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्याकडे साधे काम करत होता. गोपीनाथराव मुंडे यांच्याकडे घरगडी म्हणून काम करत होता. या माणसाकडे इतकी अफाट प्रॉपर्टी कशी आली? त्याची चौकशी व्हायला हवी? या प्रकरणाची ईडी चौकशी करण्याची मागणी केली.
वाल्मिक कराड यांच्यावर एक नाही एकूण 14 एफआयआर आहे. 14 पैकी दहा परळीमध्ये दाखल आहे. त्यात 3 जुलैचा एफआयआर मध्ये कलम 360 म्हणजे जीवे मारण्याची धमकी देणे, 323 म्हणजे कोणाला दुखापत पोचवणे, 326 म्हणजे धोकादायक शस्त्रांचा वापर करणे, 504 म्हणजे क्रिमिनलेशन असे गंभीर गुन्हे होते. त्यानंतरही त्याला शासकीय बॉडीगार्ड कसा दिला गेला? असा प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केला.
या सगळ्या प्रकरणात कारवाई का केली नाही याचे उत्तर दिले पाहिजे. धनंजय मुंडे यांनीही उत्तर दिले पाहिजे. वाल्मिक कराडसाठी त्यांचा राजकीय दबाव होता का? माझ्यासारखे लोक जे कर भरतात या कराच्या पैशात ना हे बॉडीगार्ड असतात. ज्यांना जीवे मारण्याची कोणी जर धमकी दिली असेल त्यांना सुरक्षा पुरवणे ठीक आहे, पण अशा गुन्हेगाराला तुम्ही आता शासकीय बॉडीगार्ड देणार हे अतिशय गंभीर आहे, असे दमानिया यांनी म्हटले.