उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसणार? सोलापुरातून मोठी बातमी समोर

| Updated on: Apr 03, 2025 | 9:11 PM

उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, सोलापुरातून मोठी बातमी समोर आली आहे.

उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसणार? सोलापुरातून मोठी बातमी समोर
uddhav thackeray (1)
Follow us on

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला, मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं जोरदार मुसंडली मारली. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा सपाटून पराभव झाला. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. महायुतीचे उमेदवार तब्बल 232 जागांवर विजयी झाले तर दुसरीकडे महाविकास आघाडीला तीनही पक्ष मिळून केवळ 50 जागांवरच समाधान मानावं लागलं, दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे, अनेक नेते आणि पदाधिकारी महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळत आहे, याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. आतापर्यंत शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी  शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे उद्धव ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते दीपक आबा साळुंखे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यातच आज सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दीपक आबा साळुंखे यांच्या ऑफिसला भेट दिली, या भेटीमुळे चर्चेला आणखी उधाण आलं आहे.

जयकुमार गोरे यांनी दीपक आबा साळुंखे यांच्या ऑफिसला भेट दिली यावेळी त्यांनी जयकुमार गोरे यांचं जंगी स्वागत केलं. जयकुमार गोरे यांच्या स्वागतासाठी फटाक्याची अतिशबाजी करण्यात आली, तसेच तब्बल पंचवीस फुटांचा तुळशीपासून बनवण्यात आलेला खास हार क्रेनच्या मदतीनं जयकुमार गोरे यांना घालण्यात आला, फुलांची उधळण देखील करण्यात आली.  यावेळी जयकुमार गोरे आणि दीपक साळुंके यांच्यामध्ये चर्चा झाली. या भेटीमुळे आता चर्चेला आणखीनच उधाण आलं आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आता आणखी एक धक्का बसणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान यापूर्वी देखील उद्धव ठाकरे यांना अनेक धक्के बसले आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातील अनेक नगरसेवकांनी, तसेच नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिवसेना आणि भाजपात प्रवेश केला आहे.