जालन्यात आता लसीकरणाच्या रांगेतील नागरिकांचीही अँटिजेन टेस्ट; राजेश टोपेंचे आदेश

| Updated on: May 10, 2021 | 7:34 PM

जालन्यात आता कोरोनाची लस घेण्यासाठी रांगेत उभे राहणाऱ्यांचीही अँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे. (antigen test mandatory for every person in jalna)

जालन्यात आता लसीकरणाच्या रांगेतील नागरिकांचीही अँटिजेन टेस्ट; राजेश टोपेंचे आदेश
rajesh tope
Follow us on

जालना: जालन्यात आता कोरोनाची लस घेण्यासाठी रांगेत उभे राहणाऱ्यांचीही अँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तसे आदेशच आज दिले आहेत. त्यामुळे जालन्यातील लसीकरण आणि कोरोना चाचणीचं काम वेगाने होणार आहे. (antigen test mandatory for every person in jalna)

जिल्हाधिकारी कार्यालयात राजेश टोपे यांनी आज कोरोनाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी हे आदेएश दिले. या बैठकीला जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उप विभागीय अधिकारी संदीपान सानप, अतिरिक्त पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख, जिल्हा शल्यचित्किसक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगांवकर, नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नार्वेकर, डॉ. संतोष कडले, डॉ. संजय जगताप, अन्न व औषध विभागाच्या अंजली मिटकर आदी उपस्थित होते.

रुग्णासोबत नातेवाईक थाबू देऊ नका

जिल्ह्यात कोरोना बाधित होण्याचा दर वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोनामुळे मृत्युही होत आहे. जिल्ह्यात वाढत चाललेला संसर्ग रोखण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढविण्याबरोबरच बाधित रुग्णांच्या सहवासितांचा अचूकपणे शोध घेण्यात यावा. डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसमवेत त्यांचे नातेवाईक थांबत असल्याचे निर्दशनास येत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात फैलावू शकत असल्याने कुठल्याही ठिकाणी बाधित रुग्णासोबत नातेवाईक थांबणार नाहीत, याची दक्षता घ्या, असे आदेश टोपे यांनी दिले. प्रत्येक कोव्हीड हेल्थ सेंटर, कोव्हीड केअर सेंटरवर पोलीस प्रशासनामार्फत पोलीसांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच उप विभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी सातत्याने या सेंटरला भेटी देऊन पाहणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

बाधित रुग्णांना दरदिवशी फोन करा

अनेक लोक ताप, सर्दी, खोकला यासारखी कोरोनाची लक्षणे असतानासुद्धा दुखणे अंगावर काढतात. त्यामुळे त्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत व रुग्णांची प्रकृती खालावून अनेकप्रसंगी रुग्णांचा मृत्यूही होतो. त्यामुळे बाधित असलेल्या प्रत्येक रुग्णांशी डॉक्टरांनी फोनद्वारे संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची चौकशी करत त्यांना होत असलेल्या त्रासाची माहिती दरदिवशी जाणून घेऊन त्यांना उपचाराच्यासंदर्भाने आवश्यक ते मार्गदर्शन करा. तसेच जिल्ह्यात सुरु असलेल्या लसीकरणाच्या ठिकाणी रांगेमध्ये उभे असलेल्या नागरिकांची अँटीजेन तपासणी करण्यात यावी. जेणेकरुन नागरिक बाधित असल्यास त्याच्यापासून दुसऱ्याला होणारा संसर्ग रोखण्यास मदत होण्याबरोबरच लसही वाया जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

कोविड सेंटरमधील मनुष्यबळ वाढवा

कोरोना बाधित अथवा संशयित रुणांना कोविड केअर सेंटरमध्ये सर्व सोयी-सुविधा प्राधाण्याने मिळाव्यात. या ठिकाणची स्वच्छता दररोज होईल याकडे लक्ष देण्यात यावे. तसेच या ठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जाही उत्तम राहील, याची दक्षता घेण्यात यावी. त्याचबरोबर रुग्णांना चांगल्या पद्धतीच्या वैद्यकीय सेवा मिळाव्यात यासाठी पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ ठेवण्याबरोबरच डीसीएचसी, सीसीसीमध्ये ठेवण्यात येणाऱ्या रुग्णांबरोबरच गृहविलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णांची सीबीसी, सीआरपी आदी चाचण्या प्राधान्याने करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

प्रत्येक नगरपालिकेसाठी स्वतंत्र शववाहिका घ्या

खासगी दवाखान्यात कोविड बधितांवर उपचारापोटी आकारण्यात येणाऱ्या देयकांचे दर शासनाने ठरवून दिले आहेत. रुग्णांना उपचारापोटी देण्यात येणारी देयके तपासण्यासाठी प्रत्येक खासगी दवाखान्यात परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून या परीक्षकांकडून प्रत्येक देयक काटेकोरपणे तपासले जाईल व नागरिकांकडून अधिकचे देयक घेतले जाणार नाही, याची जिल्हा प्रशासनाने दखल घेण्याची सूचनाही त्यांनी केली. जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय दवाखान्यांबरोबरच सीसीसीमध्ये पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध राहण्यासाठी डॉक्टर, नर्सेस, तांत्रिक कर्मचारी, सेवक आदी पदांची तातडीने भरती करण्याबरोबरच नवनियुक्ती डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात यावे. जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिकेसाठी स्वतंत्र शववाहिका तातडीने खरेदी करण्याच्या सूचनाही त्यांनी केली. (antigen test mandatory for every person in jalna)

 

संबंधित बातम्या:

नातेवाईकांचा कोरोना रुग्णांसोबत रुग्णालयातच मुक्काम; औरंगाबादमध्ये खळबळ

औरंगाबाद महापालिकेत तृतीयपंथींना नोकरी, आस्तिककुमार पांडेय यांचा स्तुत्य निर्णय

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला कसं रोखायचं?; औरंगाबादमधील डॉक्टरांना मिळणार घाटीत प्रशिक्षण

(antigen test mandatory for every person in jalna)