नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील माजी 13 नगरसेवकांनी आणि संपर्कप्रमुखांनी बाळासाहेबांची शिवसेना अर्थातच शिंदे गटात प्रवेश केल्यानं ठाकरे गटाने विशेष रणनीती आखली आहे. शिंदे गटात दाखल झालेल्या माजी नगरसेवकांच्या प्रभागात शिवसेनेचे उपनेते सुनील बागूल मेळावे घेणार आहे. त्याकरिता 25 डिसेंबरपासूनचे नियोजन करण्यात आले आहे. ठाकरे गटातील माजी नगरसेवक किंवा पदाधिकारी शिंदे गटात दाखल होऊ नये याकरिता ठाकरे गटाने थेट शिंदे गटात दाखल झालेल्या नगरसेवकांच्या प्रभागात जाऊन हल्लाबोल करण्याचा प्लॅन आहे. यासाठी शिवसेनेचे उपनेते सुनील बागूल यांच्या खांद्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. मागील आठवड्यात शिंदे गटात ठाकरे गटातील 13 माजी नगरसेवकांनी प्रवेश केला आहे, त्यानंतर लागलीच संजय राऊत यांच्या निकटवर्तीय तथा नाशिक शहर संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाने याचा मोठा धसका घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांच्या प्रभागात सुनील बागूल हे मेळावे घेणार आहे.
सुनील बागूल हे ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते आहे. सुनील बागूल यांचे नाशिकच्या राजकारणात दबदबा आहे, त्यामुळे थेट शिंदे गटावर हल्लाबोल करण्यासाठी बागूल यांनाच ठाकरे यांनी मैदानात उतरवले आहे.
सुनील बागूल हे जून शिवसैनिक आहे, शिवसेना सोडून त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला होता, त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये कमळ हाती घेतले होते.
मात्र, त्यानंतर सुनील बागूल यांनी पुनः शिवसेनेत प्रवेश करून आपली घरवापसी केली होती, त्यांच्या सोबत माजी आमदार वसंत गीते देखील शिवसेनेत आले होते.
शिंदे गटातील प्रवेश रोखण्यासाठी आणि गेलेल्या नगरसेवकांनावर हल्लाबोल करण्यासाठी बागूल यांना ठाकरे गटाने मोठी जबाबदारी दिली असून त्यामध्ये सुनील बागूल यांना यश येते का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.