संजय सरोदे, अंतरवाली , जालना, दि. 2 डिसेंबर | मराठा समाजातील तरुणांना सरकार अटक करत आहे. गुन्हे दाखल करत आहे. यासंदर्भात सरकारने दिलेले आश्वसन पाळले जात नाही. सरकारच्या पाठबळाशिवाय स्थानिक पोलीस असे करु शकत नाही. तुम्ही कोणता डाव टाकला आहे. पण तुम्हाला हा डाव परडवणार नाही. आम्हाला अटक होईल, पण पुन्हा बाहेर येऊ. परंतु त्यानंतर पुढचे डाव अवघड राहतील, असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला. ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना त्यांनी हा इशारा दिला. आपणास अटक होण्याची चर्चा सुरु आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले, मला अटक करा. मी तयार आहे. परंतु त्यानंतर तुम्हाला कळेल. मराठा समाज काय आहे, असे आव्हान त्यांनी राज्य सरकारला दिले.
मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यव्यापी दौऱ्याचा चौथा टप्पा १ डिसेंबरपासून सुरु झाला. खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यात त्यांच्या ठिकठिकाणी सभा होणार आहेत. त्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजातील ३२ लाख तरुणांना आरक्षण मिळाले. आरक्षण आपणास मिळणारच आहे. यामुळे मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावे. ठिकाणी ठिकाणी माझ्या सभा होत आहे. परंतु या सभेपूर्वी रॅली काढल्या जात आहे. त्यामुळे सभेला उशीर होत आहे. यामुळे आता रॅल्या बंद कराव्यात, अशी विनंती त्यांनी केली.
आम्ही ओबीसी आरक्षणमध्ये आहोत आणि आमच्या नोंदी सापडल्या आहेत. आम्हाला आरक्षण मिळवणारच आहे. आमच्या आरक्षणाविरोधात काही जण रस्त्यावर आले आहे. त्यांना ओबीसीमध्ये आम्ही नको आहेत. परंतु आम्ही ओबीसीच आहोत. राज्यभरात त्या नोंदी मिळत आहे. आम्ही धनगर समाज आणि वंजारी बांधवा यांच्या आरक्षणाला धक्का लावत नाहीत.
आपण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना विनंती केली आहे, आंदोलकांवर होणारी कारवाई थांबवावी. परंतु काही पोलीस आकसापोटी कारवाई करत आहे. पोलिसांना जात नसते आणि नासायला पाहिजे तेव्हाच राज्य शांत राहते. पोलीस आपला मित्र आहे, साथ देणारे आहे, अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली पाहिजे. परंतु माजलगावमध्ये पोलीस जातीयवाद निर्माण करत आहेत. माजलगावचे स्थानिक आमदाराच्या सांगण्यावरुन कारवाई होत आहे. परंतु तुम्हाला उद्या तुम्हाला आमच्या दारात यायचे आहे, असे मनोज जरांगे यांनी लोकप्रतिनिधींना सुनावले.
जरांगे पाटील यांना असे का वाटते की त्यांना अटक होईल. सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहे. ज्या, ज्या ठिकाणी नोंदी सापडतात, त्या त्या ठिकाणी काम केले जात आहे. जरांगे पाटील यांनी मनात भीती बाळगू आहे, असे राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.