पुणेः प्रकाशक, लेखक आणि संपादक अशा चौफेर वावराने मराठी साहित्यात वेगळी छाप पाडणारे अरुण जाखडे (Arun Jakhade) यांचे पुण्यात आज आकस्मिक निधन झाले. गेल्या काही दिवसांपूर्वी मेहता प्रकाशनाचे सुनील मेहता यांचे निधन झाले. त्यानंतर आता जाखडे यांच्या निधनाची वार्ता आल्याने साहित्य वर्तुळातून दुःख व्यक्त होत आहे. जाखडे यांनी पद्मगंधा ही प्रकाशनसंस्था नावारूपाला आणली. पद्मगंधा प्रकाशनातर्फे गणेश देवी, रा. चिं. ढेरे, व. दि. कुलकर्णी अशा मराठीतील अनेक लेखक-संशोधकांचे ग्रंथ प्रसिद्ध करून मराठी साहित्यात मोलाची भर घातली. शिवाय विविध वृत्तपत्रांतून त्यांनी 5 वर्षांहून अधिक काळ सातत्याने लेखन केले आहे. त्यांच्या संपादकत्वाखाली ‘पद्मगंधा’ आणि ‘आरोग्य दर्पण’ हे दिवाळी अंक निघत असत. या अंकाचा दर्जाही अतिशय उत्तम असे.
नगरमध्ये शिक्षण
अरुण जाखडे यांचे गाव अतिशय लहान आणि खेडे होते. गावात पोस्टमन, शाळा, दवाखाना, एस.टी. वगैरे वगैरे काहीच नव्हती. त्यामुळे त्यांचे बालपणच नव्हे तर वयाची 20 वर्षे रानावनांत भटकण्यात, काट्याकुट्यातून चालण्यात, नद्या-ओढ्यांत बागडण्यात गेली. हायस्कूलसाठी थोड्याशा मोठ्या गावात ते गेले. बोर्डिगमध्ये राहिले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण अहमदनगर येथे झाले. एफ.वाय.बी.एस्सी.नंतर त्यांना नैराश्य आलेय. शिक्षणाला रामराम ठोकून ते गावी परतले. एक वर्षाने पुन्हा नगरच्या कॉलेजात दाखल झाले.
पद्मगंधाची सुरुवात अशी
बी.एस्सी.नंतर जाखडे यांनी काही काळ ‘कायनेटिक इंजिनिरिंग’मध्ये नोकरी केली. तिथून ‘ड्रिल्को मेटल कार्बाईड’मध्ये आले. मेटलर्जीच्या परीक्षा देणे शक्य व्हावे म्हणून ‘ड्रिल्को’ सोडून ते 1982 साली ते पुण्याला ‘बजाज टेम्पो’त दाखल झाले. कारखान्यातील कामगारांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी जाखडे यांनी 1988 मध्ये ‘पद्मगंधा’चा पहिला दिवाळी अंक काढला. त्यानंतर त्यांनी साहित्यक्षेत्रात दमदार अशी वाटचाल केली.
विपुल लेखन
अरुख जाखडे यांनी मराठी साहित्यात डॉ. रा. चिं. ढेरे, लावणी वाड्मय, श्री. व्यं. केतकर, र. धों. कर्वे, अगाथा ख्रिस्ती, भाषा प्रकल्प आणि नंतर अल्बेर कामूच्या साहित्यावर विशेष काम केले. ते स्वतःही उत्तम लिहित. त्यांची पाचरूट ही कादंबरी, एक काडी गवताची हा कथासंग्रह, इर्जिक हा ललित लेखसंग्रह, गावमोहर ही मुलांसाठीची कादंबरी प्रसिद्ध आहे. त्यांनी बालवाड्मय, विज्ञान, इतिहास अशा विषयांवर विपुल लेखन केले. त्यांना राज्यशासन, महाराष्ट्र फाउंडेशनसह विविध पुरस्कार मिळआले.
जाखडे यांनी लिहिलेली/संपादित केलेली पुस्तके
– इर्जिक (स्तंभलेखनातील लेखांचा संग्रह)
– धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
– पाचरुट (कादंबरी)
– पावसाचे विज्ञान (बालसाहित्य)
– People’s Linguistic Survey of India, दुसरा भाग – The Languages of Maharashtra – १७वा खंड (इंग्रजी, सहलेखक : गणेश देवी)
– प्रयोगशाळेत काम कसे करावे
– भारताचा स्वातंत्र्यलढा
– भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण
– विश्वरूपी रबर
– शोधवेडाच्या कथा
– हुसेनभाई बाताड्या (कादंबरी)
Nashik Oxygen|राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट नाशिकमध्ये; उत्तर महाराष्ट्राचीही चिंता मिटली