सिंधुदुर्ग : भाजपचे नेते नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग येथील मेडिकल कॉलेजचं उद्या (7 फेब्रुवारी) उद्घाटन होणार आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन होणार आहे. त्यासाठी शाह स्वत: सिंधुदुर्गात येणार आहेत. राणेंनी शहांची प्रत्यक्ष भेटून निमंत्रण देताच शहा यांनीही त्यांना कार्यक्रमाला येण्यासाठी होकार दिला आहे. दरम्यान, या कार्यक्रमापूर्वी नारायण राणे यांनी आज सिंधुदुर्गात एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राणेंनी राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. (Narayan Rane on Mahavikas Aghadi government)
सिधुदुर्गातील पत्रकार परिषदेत नारायण राणे म्हणाले की, “राज्यात असं सरकार (महाविकास आघाडी) असू नये. मी प्रार्थना करेन की, अमित शाह महाराष्ट्रात, सिंधुदुर्गात येताच महाविकास आघाडी सरकार जावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात कर्तबगार लोकांचं इथल्या नागरिकांच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करणारं सरकार यावं.”
दरम्यान, राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. राणे म्हणाले की, “ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी केली, सत्तेसाठी सौदा केला, त्या दिवशी त्यांनी हिंदुत्वाला तिलांजली दिली, वैयक्तिक स्वार्थासाठी आणि केवळ मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं.”
मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी आज मीडियाशी संवाद साधला. कालही (5 फेब्रुवारी) त्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी राणे म्हणाले होते की, अमित शहांना माझ्या कॉलेजच्या परवानगीसाठी दोन वेळा फोन केले होते. परवा मी आमंत्रण देण्यासाठी गेलो तेव्हा ते म्हणाले की, “मैं सौ टक्का आऊंगा.” त्यांनी लगेच.आमंत्रण स्वीकारले. राणे म्हणाले की, अमित शहा हे बुद्धिवान नेते आहेत. माझे आवडते नेते आहेत,
राणेंचे शक्तिप्रदर्शन?
या कार्यक्रमातून राणे सिंधुदुर्गात शक्ती प्रदर्शन करणार असल्याचं बोललं जात होतं. पण राणे यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. हा कार्यक्रम कँपसपुरता मर्यादित आहे. बाहेर सर्वांसाठी खुला नाही. पण कार्यक्रमस्थळी शहा यांचं जोरदार स्वागत आणि मानसन्मान होईल, असं राणे म्हणाले.
आणि राणे गहिवरले…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांमुळे मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकलो. माझं ऋण आहे. या जिल्ह्याचं आरोग्य चांगलं राहावे म्हणून हॉस्पिटल काढलं. मेडिकल कॉलेजचं स्वप्न पाहिले. जिल्ह्यासाठी प्रत्येक स्तरावर खूप प्रकल्प सुरू केले. चार वर्षापासून मेडिकल कॉलेजसाठी मेहनत घेतली. सुसज्ज, आधुनिक यंत्रणा असलेलं हॉस्पिटल आहे. उद्या मेडिकल कॉलेज सुरू होत आहे. कॉलेज सुरू होत आहे याचा खूप आनंद. संकल्प केला आणि त्यात यश मिळतेय याचा आनंद आहे. पहिल्याच वर्षी प्रवेश फुल झाले. दर्जेदार कॉलेज बांधलंय. क्लासरूम, हॉस्टेल एअर कंडिशन आहेत. उद्या देशाचे गृहमंत्री अमित शहा येत आहेत. त्यांच्या हस्ते मेडिकल कॉलेजचं उद्घाटन होत आहे. हा माझा आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आहे, असं सांगताना राणेंना गहिवरून आलं होतं.
विमानतळ कधी सुरू होईल?
राणे यांना यावेळी चिपी विनातळाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, आता तो राज्य सरकारच्या अखत्यारित विषय आहे. काही मुद्दे बाकी आहेत. रस्ते, पाणी आणि वीज व्यवस्था झाल्यावर दोन महिन्यांच्या आत विमानतळ सुरू होईल. 2014 ला मी विमानतळ बांधून उभं केलं. त्यानंतर सुरू करणे पुढच्या सरकारचे काम होते, ते अजून झालं नाही. (amit shah will inaugurate narayan rane medical college)
हेही वाचा
राणे अमित शहांना उद्घाटनासाठी भेटले, त्यावेळेस शहा नेमकं काय म्हणाले?; वाचा सविस्तर
(As soon as Amit Shah visits Sindhudurg, Mahavikas Aghadi government in state should collapse : Narayan Rane)