जळगाव : 7 सप्टेंबर 2023 | राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गट राज्यात आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. शरद पवार यांनी राज्यभर दौरे सुरु केले आहेत. त्यांच्या सभांना गर्दी होत आहे. तसेच, अनेक माजी आमदार, पदाधिकारी शरद पवार यांच्यासोबत पुन्हा येत आहेत. जळगाव येथील त्यांच्या सभेतही भाजपच्या एका माजी आमदारांनी शरद पवार यांचा हात हाती घेतला. आता याच माजी आमदाराने आपल्या शिष्याविरोधात आगामी विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली आहे.
जळगाव येथील सभेत अमळनेर मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. हा अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे. डॉ. बी. एस. पाटील यांच्या पक्ष प्रवेशामुळे मंत्री अनिल पाटील यांच्यात राजकीय सामना रंगणार अशा चर्चा रंगल्या आहेत.
राष्ट्रवादीचे अजित पवार गटातील मंत्री अनिल पाटील यांचे राजकीय गुरु अशी डॉ. बी एस. पाटील यांची ओळख आहे. मात्र हीच गुरु शिष्याची जोडी आगामी विधानसभा निवडणुकीत आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत. गुरू डॉ. बी. एस. पाटील यांनीच तशी शक्यता वर्तविली आहे.
राजकारणात कुणी गुरू आणि शिष्य नसतात. मला पक्षाने जबाबदारी दिली तर विद्यमान मंत्री अनिल पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढणार स्पष्ट भूमिका माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी घेतलेली भूमिका ही कुणालाही आवडलेली नाही. मात्र, शरद पवार यांची भूमिका आवडली. त्यामुळेच शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी प्रवेश केला असल्याचे डॉ. बी. एस. पाटील यांनी स्पष्ट केले.
मला उमेदवारी मिळावी. आमदारकी मिळावी म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेलो नाही. मी स्वतःहून कुठल्याही पद्धतीचे उमेदवारी अथवा निवडणुकीचे तिकीट मागणार नाही. पक्षाने मला जबाबदारी दिली तरच मी आगामी काळात निवडणूक लढवणार असल्याचेही डॉ. बी. एस. पाटील म्हणाले.
डॉ. बी एस पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटातील मंत्री अनिल पाटील यांचे राजकीय गुरू आहेत, त्यावर विचारले असता ते म्हणाले, राजकारणात कुणी कुणाचा गुरु किंवा शिष्य नसतो. प्रत्येकाने आपापली राजकीय भूमिका निभवायची असते. पक्ष म्हणून विरोधात असलो तरी त्यांच्यासोबतचे नाते मात्र कायम राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.